नाशिक : येथील कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक संशयित नरेश कारडा यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. यामुळे त्यांचा पाय खोलात गेला आहे. त्यांना जिल्हा व सत्र न्यायाालयाने रविवारी (दि.५) पुन्हा दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तसेच, संध्याकाळी उपनगर येथे जमिनीचा परस्पर सौदा केल्याप्रकरणी ४ कोटींच्या फसवणुकीचा नवीन गुन्हा कारडा यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.
संशयित नरेश कारडा यांनी १ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध यापूर्वी मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असताना आता उपनगर पोलिस ठाण्यात नव्याने ४ कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हादेखील आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी राहुल जयप्रकाश लुणावत आहे, तर दुसऱ्या गुन्ह्यात जळगावचे सुनील देवकर यांनी फिर्याद दिली आहे. पहिल्या गुन्ह्यातील संशयित कारडा यांचे मोठे बंधू मनोहर कारडा यांनी गुरुवारी (दि. २) दुपारी देवळाली कॅम्पजवळील संसरी गावाच्या शिवारात धावत्या मालगाडीपुढे उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली हाेती. या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली होती.
कारडा यांचे जळगावातील गजानन दामोदर देवकर (९०) यांच्याशी जुने व्यावसायिक संबंध आहेत. १४ जून २०१७ रोजी कारडा यांच्या मालकीच्या मौजे पंचक शिवारातील व महापालिका हद्दीतील स.न. ७०/१ ब २ व ३ पैकी अंतिमरीत्या अभिन्यासातील बिनशेती प्लॉट मिळकत (नं. ०३ क्षेत्र ४१२८ चौ.मी.) या व्यवहारासाठी गजानन देवकर व नरेश कारडा यांच्यात व्यवहार झाला होता. ही जागा देवकर व त्यांचे शालक मुकुंद शंकरराव भाटे (लासलगाव) यांनी पाहिलेली होती. त्यांच्यात चार कोटी रुपयांचा व्यवहार ठरलेला होता. त्याप्रमाणे देवकर यांनी नरेश कारडा यांना एकदा दीड कोटी, दोन वेळा एक कोटी आणि पुन्हा पन्नास लाख रुपये धनादेशांद्वारे अदा केले. यानंतर कारडा यांनी या जमिनीचा परस्पर २०१९ साली राहुल कन्हैयालाल कलानी (२८,रा. जयभवानीरोड, ना.रोड) यांना विकली, असे फिर्यादी देवकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जात आहे.