सिन्नर : पांढुर्ली - भगूर रस्त्यावरील विंचूरदळवी शिवारातून वॅगनार कार अडवून खंडणीसाठी अपहरण केलेल्या नाशिकरोड येथील तरुण बांधकाम व्यावसायिकाला अपहरणकर्त्यांनी संगमनेर तालुक्यात सोडून दिले. अपहरणकर्त्यांनी या युवकाची सुटका केल्यानंतर त्याने वडिलांसोबत संपर्क साधला. त्यानंतर पोलीस त्याला सिन्नरला घेऊन आले. नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या डॉ. कैलास कोलते यांचा मुलगा प्रांजल (२८) याने गेल्या काही दिवसांपूर्वीच पांढुर्ली येथे चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास प्रांजल या कामाची पाहणी करण्यासाठी पांढुर्ली येथे आला होता. त्यानंतर पावणेआठ वाजेच्या सुमारास तो आपल्या वॅगनार कारने (क्र. एमएच १५ बीएक्स ७८५४) परत नाशिकरोडला जात असताना विंचूरदळवी शिवारात इंडिका कारमधून आलेल्या अज्ञात युवकांनी त्याची कार अडकवून त्याला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवून नेले होते. त्यानंतर अज्ञात अपहरणकर्त्यांनी प्रांजलचे वडील डॉ. कैलास कोलते यांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा दम दिला होता. प्रांजलचे अपहरण झाल्यानंतर विंचूरदळवी शिवारात रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच्या वॅगनार कारभोवती परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर घटनास्थळी डॉ. कैलास कोलते व पोलीस आले होते. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात अपहरणकर्त्यां-विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा पोलीसप्रमुख संजय मोहिते, अप्पर अधीक्षक गिरीश मोहिते, पोलीस उपअधीक्षक संदीप आटोळे, पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी याप्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगून वेगाने तपासाची सूत्रे फिरवून प्रांजलच्या जीविताला धोका पोहोचणार नाही याची काळजी घेत अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली होती. (वार्ताहर)
अपहृत युवक सुखरूप परतला
By admin | Published: January 11, 2015 12:59 AM