नाशिक : खाकी वर्दीतील कामाच्या तणावामुळे माणसाच्या मनावर आपसूकच शुष्कतेचे कवच निर्माण होते. त्या शुष्कतेलादेखील दूर करण्याचे सामर्थ्य कलाकारांच्या कलांमध्ये असते. नाशिकमधील विविध कलाकारांच्या अशा संयुक्त प्रदर्शनाने सर्व कलांना आणि कलागुणांना वाव मिळेल, असे प्रतिपादन नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले.कुसुमाग्रज स्मारकात जनस्थान या वॉट्सअप ग्रुपच्या वतीने आयोजित जनस्थान फेस्टिव्हलचा प्रारंभ चित्रशिल्प प्रदर्शनाने करण्यात आला. महानगरातील अनेक नामवंत चित्रकारांची चित्रे आणि शिल्प प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. त्यामुळे प्रदर्शनात मांडलेल्या चित्र आणि शिल्पांना एकाचवेळी निरखत त्यांचे रसग्रहण करण्याची संधी नाशिककरांना या निमित्ताने मिळाली आहे. उदघाटनप्रसंगी यावेळी चित्रकार बाळ नगरकर, आयोजक अभय ओझरकर, विनोद राठोड आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.शुभारंभप्रसंगी बोलताना नांगरे पाटील यांनी या प्रदर्शनाची मुक्त कंठाने प्रशंसा केली. ‘‘इतक्या विभिन्न प्रकारच्या कलाकारांना एकत्र गुंफणे आणि त्यांच्या कलांना योग्य व्यासपीठ मिळवून देणारा हा उपक्रम अनोखा आहे, असे ते म्हणाले.या प्रदर्शनात नागरिकांना सी.एल. कुलकर्णी, केशव कासार, अनिल माळी, राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, नंदन दीक्षित, शीतल सोनवणे, स्रेहल एकबोटे, संदीप लोंढे, यतिन पंडित, श्रेयस गर्गे, राजा पाटेकर यांची चित्र आणि शिल्पे ठेवण्यात आली आहेत. प्रदर्शनाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले असून १९ जूनपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत खुले राहणार आहे.
कलावंतांच्या कलेमध्ये नैराश्य दूर करण्याचे सामर्थ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:21 AM