अझहर शेख, नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध धंदे व अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले आहे. आयुक्तालयाने स्थापन केलेल्या विशेष पथकाने एका आलिशान कार म्हसरूळ परिसरात रोखली. या कारची झडती घेतली असता डिक्कीमध्ये सुमारे १०१ किलो ८८० ग्रॅम इतका गांजाचा साठा आढळून आला. पोलिसांनी दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर व परिसरात अमली पदार्थ, शस्त्रविरोधी कारवायांना वेग देण्यात आला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखांची पथके, विशेष पथकांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरूद्ध तसेच अमली पदार्थ विक्री व खरेदी करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई केली जात आहे.
विशेष पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक जयराम पायगुडे, उपनिरिक्षक दिलीप सगळे, सहायक उपनिरिक्षक रंजन बेंडाळे, हवालदार संजय ताजणे, देवकिसन गायकर, किशोर रोकडे आदींच्या पथकाने म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मानकर मळा रस्त्यावर सापळा रचला. याठिकाणी एक संशयास्पद कार (एम.एच०४ बीक्यू ०७७८) आली असता पथकाने ती अडविली. यावेळी कारमध्ये असलेले संशयित आरोपी ज्ञानेश्वर बाळु शेलार (३२,रा.मखमलाबाद), निलेश अशोक बोरसे (२७,रा.अमृतधाम) या दोघांना ताब्यात घेतले. कारच्या डिक्कीमधून सुमारे २० लाख ३७ हजार ६०० रूपये किंमतीचा गांजाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या दोघांविरूद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.