लॉकडाऊनमध्येही समृद्धीच्या कामाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 01:32 AM2021-05-24T01:32:08+5:302021-05-24T01:32:49+5:30
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.
मागील वर्षी लॉकडाऊनमुळे कारागीर तसेच मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने काही प्रमाणात काम मंदावले असले तरी कामात खंड पडलेला नव्हता. यंदाची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली असून, येथील कामाने गती घेतली आहे. नियमित कोरोना चाचणी करण्याबरोबरच सुरक्षितता नियमांचे पालन करून कामकाज सुरू असल्याने काम बऱ्यापैकी पुढे सरकले आहे.
मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.६८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बागदा या मार्गावर तयार होत आहे. सध्या ३ किलोमीटरच्या पुढे बोगद्याचे काम सरकले आहे.
राज्यातील दहा मुख्य जिल्हे आणि इतर १४ जिल्ह्यांमधून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. या महामार्गाचे १ ते १६ असे टप्पे असून, नाशिक जिल्ह्यातील बोगद्याचे काम हे १४व्या टप्प्यात सुरू आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या मार्गावर दोन
डोंगरांना जोडणारा सर्वात मोठा
पूल तयार होत आहे, तर दुसरा सर्वात उंच पूलदेखील उभारण्यात येणार
आहे. बोगद्याची उंची ९.१२ मीटर, तर रुंदी १७.६१ मीटर इतकी आहे. डाव्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८ किलो मीटर लांबीचा आहे.
n मागील वर्षी कोरोनामुळे येथील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा देशभरात लॉकडाऊन नसल्याने मजुरांचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता वाढली होती.
n त्यावर मात करीत सर्व खबरदारी घेत येथील कामकाज सुरूच ठेवण्यात आले. दर महिन्याला कोरोना चाचणीचा कॅम्प घेतला जातो. आरोग्याची तपासणी करून कामगारांच्या कामाचे नियोजन केले जात आहे.