इगतपुरीत पेरणीपूर्व मशागतीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:40 PM2020-05-24T22:40:02+5:302020-05-24T22:40:41+5:30
इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे.
लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूर घरीच बसले होते; मात्र खरिपाच्या पेरणीसाठी महत्त्वाच्या मशागतीची कामे सुरू झाल्यामुळे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
भात, नागली, वरई आदी खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेताची मशागत करणे महत्त्वाचे असते. तालुक्यातील मुख्य भात पिकाच्या पेरणीसाठी व आवणीसाठी काही दिवसांअगोदरच शेतीची नांगरणी व वखरणी करण्याचे काम वेगाने होताना दिसत आहे.
मशागतीसाठी तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागात बैलजोडीचा वापर होतो, तर काही भागात ट्रॅक्टरनेही मशागत केली जाते. तालुक्यात सध्या कोरोनाचे कोणतेही संकट नसले तरीही ते आपल्यावर येऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत शेतकरी व शेतमजूर आपला बराच वेळ शेतकामात घालवत आहे. मजुरीचे कामे करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.
यावर्षी अनेकवेळा बेमौसमी व अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या सर्व संकटांवर मात करत खरीप पिकांच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खतांसाठी पैशांची कशीबशी तजवीज करून ते खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. तसेच पुढील काळात जनावरांच्या वैरणीचीही साठवण शेतकरी करताना दिसत आहे.
देशात कोरोनाचा उपद्रव असला तरीही शेतकरी आपल्या शेतकामात व्यस्त आहेत. काहीही झाले तरी शेतीत पेरणी करून उत्पन्न घ्यावेच लागेल. शेतकरी अन्नदाता असून तोही संकटात सापडला आहे. तरीही पैशांची कशीबशी तजबीज करून बी-बियाणे, खते यांची खरेदी करीत आहे.
- भगवान पारधी
शेतकरी, खेडभैरव
इगतपुरी तालुक्यासह पूर्व भागात खरीप पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. तसेच शेतकरी बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी येत आहेत. कृषिसेवा केंद्रामध्ये शेतकरी सर्व नियमांचे पालन करीत आहेत. शेतकºयांच्या बांधावर जाऊन खते, बी-बियाणांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- सागर वाजे
कृषिसेवा केंद्र, खेडभैरव