लोकमत न्यूज नेटवर्क, घोटी/इगतपुरी (नाशिक) :नाशिक येथे जैन स्थानकात येत्या दि. २ जुलैपासून सुरू होणाऱ्या चातुर्मासासाठी मुंबईहून पायी निघालेल्या दोन जैन साध्वींना कसारा घाटात कंटेनरने पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत त्यांचा जागेवरच करुण अंत झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. भरधाव कंटेनरने अन्य दोन वाहनांनाही उडविले असून, कंटेनरचालक फरार झाला आहे. घटनेनंतर घोटी, नाशिक येथील शेकडो जैन बांधवांनी घटनास्थळी धाव घेतली, तर जिल्ह्यातील जैन समाजबांधवांत शोककळा पसरली आहे. दरम्यान, सायंकाळी नाशिकला अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सिद्धायिकाश्रीजी (३८) व हर्षायीकाश्रीजी (३४) या साध्वी शहापूर मानस मंदिर येथून नाशिकला पायी निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे साहित्य घेऊन जाणारे वाहन पाठीमागे होते. बुधवारी खर्डी येथे मुक्काम करून गुरुवारी पहाटे ४.३० वाजता त्यांनी पुन्हा आपली परिक्रमा सुरू केली. दोन्ही साध्वीजींसमवेत सेवक पारस गेहलोत होते. साध्वीजी पायी चालत असताना गेहेलोत हे पाठीमागे सुरक्षेच्या दृष्टीने व्हॅन (सी.एच. ०१ ए. आर. ७०१६) घेऊन येत होते. डाव्या बाजूला रस्त्याच्या कडेला पहाटे ५ वाजेच्या सुमारास नाशिकच्या दिशेने पायी चालत असताना कसारा घाटातील लतीफवाडी येथील ऑरेंज सिटी हॉटेलसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या (क्रमांक एम. एच. ४० ए. के. ९५७७) कंटेनरने अगोदर साध्वींच्या पाठीमागे चालणाऱ्या व्हॅनला जोरदार धडक दिली. त्यानंतर हा कंटेनर दोन्ही साध्वींना चिरडून अन्य दोन वाहनांना उडवत पुढे रस्त्याच्या खाली उतरला. या भीषण अपघातात दोन्ही साध्वींचा जागेवरच मृत्यू झाला.
जैन साध्वींच्या मृत्यूची बातमी समजताच जिल्ह्यातील जैन समाजबांधवांत शोककळा पसरली, तर अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. घोटी येथील जैन स्थानकवासी श्रावक संघाचे संघपती नंदकुमार शिंगवीव पवननगर संघाचे संघपती अनिल कर्नावट, घोटी येथील ललित पिचा, वैभव कुमट यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले.
अकोला व बुलढाणा जिल्ह्यात शोककळा
दोन्ही साध्वींच्या अपघाती निधनाने अकोला व बुलढाणा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. सिद्धायिकाश्रीजी यांचे दीक्षा घेण्यापूर्वीचे नाव शीतल सुरेशसिंग मुनोत (रा. अकोला), तर हर्षायिकाश्रीजी यांचे दीक्षा घेण्यापूर्वीचे नाव पूजा सुभाषसिंग मुनोत, (रा. मेहेकर, जि. बुलढाणा) असे आहे. अपघाताची माहिती मिळताच कसारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.