अझहर शेख, नाशिक : येवला तालुका अन् भीषण पाणीटंचाई असेच जणू अद्याप समीकरण राहिले आहे; मात्र यावर्षी वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाली. तालुक्यातील ममदापूर-राजापूर राखीव संवर्धन क्षेत्रातील काळविटांवर दरवर्षी उन्हाळ्यात ओढावणाऱ्या जलसंकटापासून यंदा दमदार पावसामुळे दिलासा मिळण्याचा आशावाद व्यक्त होत आहेत. त्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करताना महामार्गांवर काळवीटांचे ‘रोडकिल’पासून संरक्षण होण्यासदेखील मदत होईल, असा विश्वास वन्यजीवप्रेमींमध्ये व्यक्त होऊ लागला आहे.
येवला तालुक्यातील ममदापूर राखीव क्षेत्र हे काळविटांसाठी खास विकसित करण्यात आले आहे. शहरापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या ममदापूर राखीव वनक्षेत्र राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या पंचक्रोशीत पसरले आहे. एकूण ५४.४६ चौरस किलोमीटरच्या या क्षेत्रात मोठ्या संख्येने काळवीट नर-मादीचे वास्तव्य आढळून येते.
भारतीय उपखंडाची ‘ओळख’ नाशकात सुरक्षितभारतीय उपखंडाचे प्रतीक काळवीट ओळखले जाते. या राखीव संवर्धन क्षेत्रात निर्धास्तपणे काळविटांचा अधिवास पहावयास मिळत आहे. हे वनसंवर्धन क्षेत्र शिर्डी, औरंगाबाद शहरांपासूनदेखील जवळ आहे. यामुळे पर्यटकांना हे राखीव वनसंवर्धन क्षेत्र नेहमी खुणावत राहिले आहे. वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी नाशिक पूर्व वनविभागाच्या येवला वनपरिक्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.
टॅँकरद्वारे भरले होते पाणवठेमागील चार वर्षांपासून येवला तालुक्यात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाली नाही. गेल्या वर्षी या भागात अगदी कमी पर्जन्यमान राहिल्याने गेल्या मार्च ते मे महिन्यात अक्षरक्ष: राखीव संवर्धनक्षेत्रात पाणवठे टॅँकरने भरावे लागले होते. जुलैनंतर पावसाने येवला तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने येथील तलाव, विहिरींचा जलस्तरही उंचावला आहे. आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या खूप तीव्र नसेल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. काळविटांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने भटकंती थांबून शेतपिकांचेही संभाव्य नुकसान कमी होईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी म्हणाले.चार वर्षांत २५ ते ३० काळविटांचा मृत्यूमागील चार वर्षांपासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी न झाल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करताना विहिरीत पडून किंवा अज्ञात वाहनाच्या धडकेने सुमारे २५ ते ३० काळवीट नर, मादींना आपले प्राण गमवावे लागले आहे. यंदा समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने मुबलक प्रमाणात पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत निर्माण झाल्याने काळविटांचे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास उपवनसंरक्षक तुषार चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.‘इको टुरिझम’ला मिळणार चालनाममदापूर राखीव संवर्धन क्षेत्र हे नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, अहमदनगर या जिल्ह्यांपासून किमान शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे पर्यटकांना भटकंतीसाठी नेहमीच या क्षेत्राचे आकर्षण राहिले आहे. नाशिक पुव वनविभाग सातत्याने या भागात इको-टुरिझमला चालना देण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राजापूरपासून जवळच असलेल्या देवदरी गावाच्या शिवारात पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था म्हणून निवास संकुल आकाराला येत आहे. येत्या दोन महिन्यांत या वास्तूचे लोकार्पण शक्य होणार असल्याचे वनक्षेत्रपाल संजय भंडारी यांनी सांगितले. याच धर्तीवर ममदापूर, राजापूरमध्येही पर्यटन निवास संकुल विकसीत करण्यात येणार आहे. पर्यटन विकासासाठी सुमारे ३ ते ४ कोटी रूपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. या निधीमधून विविध पर्यटनपुरक विकासकामांना गती दिली जात आहे. ममदापूर येथे सायकल ट्रॅकदेखील विकसीत करण्यात आला आहे. लवकरच येथ वनविभागाच्या माध्यमातून सायकलींची उपलब्धता पर्यटकांसाठी करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटकांनी वनक्षेत्रात सायकलवरून फेरफटका मारत काळवीटांच्या उड्या सहज बघता येणे शक्य होणार आहे.