नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती बुधवारी (दि ३१) साजरी होत आहे. त्यानिमित्ताने विविध संस्थाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेषतः शहरातील द्वारका चौफुली येथे जयंती कार्यक्रम साजरा करण्याची तयारी करण्यात आली आहे. हिंदू कालगणनेनुसार अर्थात तिथीनुसार दरवर्षी हिंदू एकता आंदोलन पक्ष शिवजयंती साजरी करीत असतो. यंदाही परंपरेनुसार तिथीच्या दिवशी म्हणजे फाल्गुन वद्य तृतीयेला ( दि.३१ मार्च ) साधेपणाने शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे. नाशिक शहरामध्ये या पक्षाच्या वतीने दरवर्षी विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येत असली तरी यंदा कोरोना संसर्गाच्या संकटामुळे शासकीय नियमांचे पालन करून कार्यक्रम होतील, असे पक्षाचे नेते रामसिंग बावरी यांनी सांगितले. शहरातील द्वारका परिसरात सकाळी ११ वाजता शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व त्यानंतर शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहेत. अन्य संस्थाच्या वतीनेही सार्वजनिक कार्यक्रम टाळून जयंती साजरी होणार आहे.
तिथीनुसार आज शिवजयंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 1:38 AM