एक एकरात ३६ टन टरबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:43 AM2018-02-22T00:43:46+5:302018-02-22T00:44:04+5:30
परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे.
योगेश बोरसे
परंपरागत शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत डांगसौंदाणे परिसरातील तरुण शेतकरी वर्गाने शेतीमध्ये बदल करीत टरबूज व खरबूज या पिकांवर आपले लक्ष केंद्रित करून दोन वर्षांपासून भरघोस उत्पन्न घेत चांगली आर्थिक प्रगती साधली आहे.
पारंपरिक पिके घेऊन आर्थिक उत्पन्न टिकवून ठेवणे हे शेतकरी वर्गाचे गणित असते. मात्र आजच्या तरुणाईला ही गणिते न पटणारी आहेत. शेतीमध्ये काहीतरी नवीन प्रयोग करून दाखवण्याची जिद्द त्यांच्यात दिसून येत आहे. येथील तरुण शेतकरी महेश सोनवणे यांनी गतवर्षी आपल्या दोन-तीन मित्रांना बरोबर घेऊन तीन एकरात टरबूज या पिकाची लागवड केली. मॅक्स जातीच्या टरबूज पिकाचे तीन एकरात एकरी ३६ टन उत्पन्न घेऊन परिसरातील शेतकरी वर्गासमोर त्यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. या भागात प्रामुख्याने कांदा, गहू, मिरची, ऊस, मका ही पारंपरिक पिके घेण्यावरच शेतकरी वर्गाचा कल असतो; मात्र सोनवणे यांनी आपल्या मित्रांच्या साथीने टरबुजाची लागवड करीत भरघोस उत्पन्न घेतले. त्यांनी सहा बाय दीड फूट अंतरावर सरी तयार करून त्यावर ड्रीप, मल्चिंग पेपर, शेणखत टाकून पूर्वतयारी केल्यानंतर त्यावर उच्चप्रतीच्या टरबुजाची लागवड केली. सर्व तयारी करीत असताना त्यांनी रासायनिक खताचा अतिरेक टाळून सेंद्रिय खताला प्राधान्य दिले. तसेच कीटकनाशकांचा वापर न करता जैविक औषधांचा वापर केला. यामुळे खर्चात जवळजवळ ४० टक्यांनी बचत झाल्याचे ते सांगतात. गतवर्षी त्यांनी केलेल्या प्रयोगाने प्रभावित होत चालू वर्षी महेश सोनवणे, राजेंद्र परदेशी, रवींद्र बोरसे, जगदीश बोरसे, अंबादास सोनवणे, विजय सोनवणे, रोहित अहिरे, रवींद्र मोरे आदी शेतकºयांनी जवळजवळ ३० ते ३२ एकरात टरबूज व खरबूज या पिकांची लागवड केली आहे. पारंपरिक पिकांना दरवेळी चांगला बाजारभाव मिळेलच असे नाही, त्यामुळे आता बळीराजाकडून शेतीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. एकाच पिकावर अवलंबून न राहता वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग केल्याने आर्थिक नियोजनही चांगले होत असल्याचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे.