पंचवटीत पाच बी-बियाणे दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:20+5:302021-05-05T04:23:20+5:30
पंचवटी : राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे, ...
पंचवटी : राज्यात कोरोना संसर्ग वाढत चालल्याने शासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सकाळी ११ वाजेपर्यंत व्यवहार करण्याची परवानगी दिली आहे, मात्र असे असले तरी अनेक व्यावसायिक आस्थापनादेखील सकाळी ११ वाजेनंतर दुकानाचे अर्धे शटर उघडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी पंचवटी पोलीस ठाणे व पंचवटी महापालिका यांच्या संयुक्त पथकाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दिंडोरी रोडवरील पाच बी-बियाणे दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
सोमवारी दुपारी पंचवटी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, पंचवटी मनपा विभागीय अधिकारी विवेक धांडे, साहाय्यक अधीक्षक भूषण देशमुख, पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे विशेष पथक व मनपा कर्मचारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जनजागृती करत होते. त्यावेळी दिंडोरी रोड परिसरात असलेले पाच बी-बियाणे दुकाने अर्धवट शटर उघडे ठेवून आत व्यवहार सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी पाच दुकानदारांना ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान चालू ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे २५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
इन्फो ------
मांस विक्री दुकान सील
पेठरोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील बाजूस एक मांस विक्रीचे दुकान असून सदर दुकानदाराला मनपा व पोलीस पथकाने यापूर्वी वारंवार सूचना दिल्या होत्या तसेच त्याच्यावर दंडात्मक कारवाईदेखील केली होती, तरी कोरोना नियमांचे उल्लंघन करत दुकान सुरू ठेवत असल्याचे सोमवारी आढळून आल्याने पोलीस व मनपा पथकाने सदर दुकान सील केले आहे.