यंत्रमाग कारखान्याबाहेर कटर बाळगणाऱ्यांवर कारवाई करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:50 AM2021-02-05T05:50:08+5:302021-02-05T05:50:08+5:30
मालेगाव:- यंत्रमाग कारखान्यात सूत कटाईसाठी लागणारे कटर कारखाना आवाराबाहेर यंत्रमाग मजुरांनी बाळगल्यास त्यांच्यावर तसेच डॉक्टरांच्या पावतीशिवाय औषधे ...
मालेगाव:- यंत्रमाग कारखान्यात सूत कटाईसाठी लागणारे कटर कारखाना आवाराबाहेर यंत्रमाग मजुरांनी बाळगल्यास त्यांच्यावर तसेच डॉक्टरांच्या पावतीशिवाय औषधे व गोळ्या (कुत्ता गोळी )विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्धार पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून कटरने हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. किरकोळ वादात कटरचा वापर केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याचे ठरवले आहे. शहरातील यंत्रमाग कारखान्यात सूत कताईसाठी कटरचा वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कारखानदारांची स्वतंत्र बैठक बोलावून यंत्रमाग कामगारांना कारखान्यात कटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. कारखान्यात येतांना मजुराला कटर दिले जाईल व कारखान्यातून बाहेर पडताना कटर पुन्हा कारखान्यात जमा केले जाईल याची जबाबदारी यंत्रमाग कारखाना मालकावर देण्यात येईल याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात येतील असेही दोंदे म्हणाल्या.