घालाल धिंगाणा, तर कारवाईचा नजराणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 12:41 AM2019-10-24T00:41:54+5:302019-10-24T00:42:47+5:30
Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके मतदारसंघात गस्तीवर राहणार आहेत.
नाशिक : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागात सर्वत्र चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या सशस्त्र जवानांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथके मतदारसंघात गस्तीवर राहणार आहेत. दुचाकींच्या पुंगळ्या काढून हेतुपुरस्सर शहराची ‘हवा’ बिघडविणाऱ्यांना थेट दीपावलीच्या तोंडावर तुरुंगाची हवा खावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. कार्यकर्त्यांकडून जल्लोषाच्या नावाखाली केली जाणारी कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
मतमोजणीप्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुज्ञपणे वागावे. विजयाचा जल्लोष आपल्यापुरता मर्यादित ठेवावा, जेणेक रून इतरांना त्याचा कोणत्याही प्रकारे त्रास सहन करावा लागणार नाही आणि शहरासह जिल्ह्याच्या कायदासुव्यवस्थेला कुठलीही बाधा येणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घेण्याचे आवाहन नांगरे पाटील व सिंह यांनी केले आहे. दुचाकींच्या पुंगळ्या काढून मिरविणे, पराभूत उमेदवारांच्या दारात जाऊन धिंगाणा घालणे, त्यांच्या निवासस्थानांच्या परिसरात पुंगळ्या काढलेल्या दुचाकी भरधावपणे फिरविणे, गुलालाची उधळण करणे, आक्षेपार्ह घोषणा देऊन आपापसांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाºया कार्यकर्त्यांना तुरुंगात दीपावलीचा सण साजरा करावा लागू शकतो, असे पोलीस प्रशासनप्रमुखांनी म्हटले आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला कुठलाही धोका आपल्या वर्तणुकीमुळे होणार नाही, याची काळजी कार्यकर्त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी घेण्याची गरज असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले. शहरासह जिल्ह्यातील सर्व भागात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शहरात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे चार कंपन्या तर जिल्ह्यात केंद्रीय राखीव सशस्त्र पोलीस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह राज्य राखीव दलाच्या सुमारे ७ तुकड्या बंदोबस्तावर आहेत. मतमोजणी केंद्रांच्या परिसरात कुठलाही गोंधळ तसेच शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपºयात जल्लोषाच्या नावाखाली घातला जाणारा धिंगाणा पोलीस प्रशासन खपवून घेणार नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मतमोजणी सुरू असताना तसेच निकालानंतर धिंगाणा घालणाºयांवर कडक कारवाई होणार आहे.
नाशिकचा नावलौकिक राखा
नाशिकचा नावलौकिक व संस्कृती कायम राखली जावी. पूर्ववैमनस्यातून कुठल्याही प्रकारचा वाद उकरून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची पोलिसांकडून गय केली जाणार नसून तसे आदेश बंदोबस्तावरील सर्व अधिकाºयांना देण्यात आल्याचे नांगरे पाटील व सिंह यांनी दिले. आपल्या विजय संयमाने व शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.