नाशिक/मुंबई - राज्यात अचानक झालेल्या सत्तांतरानंतर राजकीय वातावरण विविध मुद्द्यांवरून तापलेले पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष वाढताना दिसत आहे. वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी चॅलेंज दिल्यानंतर हा वादा टोकाचा झाला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या वादात उडी घेतली. ३२ वर्षीय आदित्य ठाकरेंनी दिलेल्या आव्हानाला शिंदे-भाजप सरकार घाबरले, या शब्दांत संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर, आदित्य ठाकरेंनीही आज नाशिक जिल्ह्यातून शिंदे गटावर पलटवार केला आहे.
आदित्य ठाकरे पक्ष बांधणीसाठी सध्या शिवसंवाद मेळावा घेत असून नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यासाठी, आज निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी व युवा संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळी चक्क बैलगाडीत बसून आदित्य ठाकरे दाखल झाले. आकर्षक पद्धतीने बैलगाडी सजून यावर विराजमान होत आदित्य ठाकरेंची येथे एंट्री पाहायला मिळाली. यावेळी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. याच मेळाव्यात आदित्य यांनी शिंदे गटावर पलटवार केला. तसेच, पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान दिलं आहे. माझ्या मतदारसंघात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सभा घेत असून कितीही सभा घेतल्या, तरी माझ्या मतदारसंघात मीच जिंकणार, असे यावेळी आदित्य ठाकरेंनी म्हटले.
काय म्हणाले संजय राऊत
संजय राऊत म्हणाले की, त्यांचे पाय वरळीला लागतायत, याचा आनंद आहे. परत सांगतो, मात्र त्यांनी राजीनामा देऊन येण्याची मी वाट पाहतोय. ३२ वर्षाच्या तरुणाला सरकार कसे घाबरते, हे वरळीत महाराष्ट्र पाहिले. आम्ही मोदींची माणसे आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात वरळीत मोदी सेना येणार आहे, असा खोचक टोलाही संजय राऊतांनी यावेळी लगावला.