नाशिक : महापालिकेच्या घंटागाडी कामगारांना २१ दिवसांच्या सुट्यांच्या बदल्यात मोबदला आणि सानुग्रह अनुदान बॅँकेत जमा झाल्याचे ठेकेदाराने पुरावे दिल्यानंतर अखेरीस शनिवारी दुपारी १२ वाजेपासून घंटागाड्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. सुमारे दीड दिवसाच्या संपामुळे तीन विभागांमध्ये ठिकठिकाणी कचरा साचला असून, आता तो रात्री उशिरापर्यंत हटविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.घंटागाडी कामगारांना वार्षिक २१ भर पगारी सुट्या किंवा सुटीच्या बदल्यात मोबदला देण्याचे आदेश कामगार उपआयुक्त कार्यालयाने यापूर्वीच दिले असून, तरीही सिडको, सातपूर आणि पश्चिम नाशिक विभागाचा ठेका घेणाऱ्या वॉटरग्रेस प्रॉडक्टकडून ही रक्कम मिळाली नाही, असे घंटागाडी कामगारांच्या श्रमिक सेवा संघाचे म्हणणे आहे. त्यामुळे या तिन्ही विभागांतील घंटागाड्या शुक्रवारी सातपूरच्या क्लब हाऊसमध्ये ठेवण्यात आल्या. त्यामुळे त्या विभागांमध्ये दीडशे टन कचरा पडून राहिला. त्यानंतर शनिवारी सकाळीदेखील या घंटागाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी अकरा वाजता घंटागाडी कामगार ‘रामायण’ येथे जमले होते. महापौर अशोक मुर्तडक यांच्या उपस्थितीत या कामगारांची बैठक झाली. महापौरांनी कामगारांची कोणतीही देणी अडून राहणार नाही, असे यावेळी स्पष्ट केले. यावेळी ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या नावावर प्रलंबित पगारी सुट्यांची रक्कम जमा केल्याचे स्पष्ट केले, तशी कागदपत्रे दाखविल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान, दुपारी १२ वाजेनंतर या तिन्ही विभागांतील घंटागाड्या सुरू करण्यात आल्याचा दावा श्रमिक सेवा संघाचे उपाध्यक्ष महादेव खुडे यांनी केला. घंटागाड्या दुपारपर्यंत बंद असल्याने ज्या भागात कचरा साचला आहे, तेथे रात्री उशिरापर्यंत साफसफाईची कामे केली जातील, असेही खुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)