नाशिक : ‘उडाले ते कावळे, उरले ते मावळे’ असे म्हणू शकण्याची क्षमता केवळ आणि केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती. कारण कुणीही गेले तरी पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था आणण्याची क्षमता, संघटनकौशल्य आणि करिश्माई नेतृत्व आपल्याकडे असल्याचा आत्मविश्वास बाळासाहेबांकडे होता. त्यांचीच छबी भासणारे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना मात्र तसे म्हणण्यासारखी परिस्थिती सध्या तरी नाही. महानगरातून अवघ्या दहा वर्षांपूर्वी तीन विधानसभा जिंकणाऱ्या मनसेला नाशिकमध्ये पक्षाची फेररचना, करण्यासह निम्म्या जागा वगळता अन्यत्र दमदार उमेदवारांचा शोध घेतानाच दमछाक उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मनसेची पक्षस्थापना झाल्यानंतर अवघ्या तिसºयाच वर्षी पक्षाने २००९च्या निवडणुकीत (कै.) अॅड. उत्तमराव ढिकले यासह तीन जण निवडून आले. राज्यात एकूण १३, तर नाशिक शहरातच पक्षाने तीन उमदेवार पदार्पणात निवडून आणले होते. मात्र, त्यानंतर पक्षनेतृत्वाने घेतलेल्या निर्णयांमुळे तसेच नाशिक महापालिकेतील सत्ताप्राप्तीनंतरही फारशी किमया दाखवू न शकला नाही. त्यातच २०१४च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत या तिन्ही जागा खालसा झाल्या. पाठोपाठ महापालिकेत असलेल्या ४० पैकी जवळपास तीस जणांनी पक्षांतर केले. पक्षाची अवस्था क्षीण होत असतानाही नंतर ते सावरण्याचे प्रयत्न झालेले नाही. कदाचित ही धोक्याची घंटा मानून तेव्हापासूनच पक्षबांधणी, नवीन नेतृत्वाला पुढे आणले गेले असते, तर मनसेला सध्याइतकी धावाधाव करण्याची वेळ आली नसती. २०१४ला नाशिककरांनी आपल्याला का नाकारले, त्याबाबत नाशिककरांना दोष देण्यापेक्षा त्याचे पक्षीय स्तरावर आत्मचिंतन झाले असते आणि जर पक्षाची बांधणी व्यवस्थित झाली असती, तर यंदाच्या निवडणुकीत पक्ष सावरू शकला असता हे वास्तव आहे. मात्र, संघटन स्तरावर पक्षाची बांधणीच विशविशीत राहिल्याची जाणीव आता नेतृत्वाला झाली असून, हीच फेरमांडणी करण्यावर भर द्यावा लागणार आहे.सुपीक भूमी का ठरली नापीक?मुळात ज्या नाशिक महानगरामध्ये दहा वर्षांपूर्वी मनसेने तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकल्या होत्या, त्या पक्षावर अवघ्या दोन निवडणुकांनंतर सक्षम उमेदवारांचा शोध घ्यायला लागणे ही परिस्थिती का उद्भवली, त्याचादेखील विचार व्हायला हवा. २००९ मध्ये तीन जागा जिंकल्यानंतर असो किंवा २०१४ मध्ये नाशिकच्या तिन्ही जागांवर पराभव पदरी पडल्यानंतर असो पक्षीय संघटनात्मक स्तरावर काही विचारमंथन होणे, फेरबांधणी, पुनर्रचना, पुढील आंदोलनांची दिशा, पक्षीय मेळावे, युवा संघटन मेळावे, महिला मेळावे, बेरोजगार मेळावे किंवा बैठकाच झाल्या नाहीत, हे वास्तव आहे.केवळ राज ठाकरे आल्यानंतर होणाºया बैठका आणि पक्ष कार्यालयाबाहेरील गर्दी म्हणजे पक्षीय संघटन नसते, या जाणीवेचा स्थानिक नेतृत्वात असलेला अभावच मनसेच्या यशाचा उंच आलेख एकाच निवडणुकीत रसातळाला नेणारा ठरला. मनसेसाठी नाशिकसारखी सुपीक भूमी नापीक झाल्याने नाशिकची राजकीय जमीन पुन्हा सकस करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.
पदार्पणातील यशानंतर मनसेला घरघर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 1:36 AM