सर्वच पक्षांना बंडखोरीचे ग्रहण
By admin | Published: February 15, 2017 01:13 AM2017-02-15T01:13:16+5:302017-02-15T01:13:31+5:30
चांदवड तालुका : पक्षीय उमेदवारांसमोर आव्हान; मतांची विभागणी होणार
महेश गुजराथी : चांदवड
तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपा व शिवसेनेत युती न झाल्याने दोन्ही पक्ष वेगवेगळ्या निवडणुका लढवीत आहे तर कॉँग्रेस व राष्ट्रवादीत मात्र आघाडी झाल्याने त्यांनी दोन-दोन गट व चार-चार गण वाटून घेतले असले तरी निष्ठावानांना डावलल्याने बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. तिचा फटका पक्षीय उमेदवारांना बसू शकतो, याची चिंता राजकीय पक्षांना सतावत आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतच नव्हे तर भाजपामध्येही बंडखोरी झाल्याचे चित्र बऱ्याच गटात दिसून येत असल्याने या बंडखोरीमुळे एखाद्या चांगल्या पक्षीय उमेदवारास फटका बसेलच असे बोलले जात आहे. कारण मताची विभागणी ही होणार व पक्षीय उमेदवारांना अखेरच्या क्षणी याचा फटका बसेल असे चित्र तरी बऱ्याच गटात व गणात दिसून येत आहे. दुगाव गटात राष्ट्रवादी कॉँग्रेस, भाजपा, शिवसेना व रिपब्लिकन पार्टी असा चौरंगी सामना होत असून पूर्वीचा राष्ट्रवादी कॉँग्रेस गट म्हणून ओळखला जातो. येथे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील शेलार, शिवसेनेचे प्रा. राजेंद्र सोमवंशी, रिपब्लिकनचे राजेंद्र लक्ष्मण गांगुर्डे असा चौरंगी सामना होत आहे.
चांदवड तालुक्यात प्रतिष्ठेचा समजला जाणारा तळेगावरोही गटात अखेर कॉग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली तरी येथे बंडखोरी झाली. येथून राष्ट्रवादीचे प्रा. मधुकर टोपे यांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली आहे. तर भाजपातूनही ज्यांना तिकिटाची खात्री होती ते डॉ. राजेंद्र दवंडे यांनी अखेर बंडखोरी केली. त्यामुळे गटातील एकगठ्ठा मते बंडखोर किती घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे. येथे माजी आमदार शिरीष कोतवाल यांचे सुपुत्र राहुल शिरीष कोतवाल हे कॉँग्रेसकडून उभे आहेत तर त्यांच्या विरोधात भाजपाचे सर्वेसर्वा माजी आमदारांचे माजी शिष्य डॉ. आत्माराम कुंभार्डे हे भाजपाकडून उभे असून विधानसभा निवडणुकीत माजी आमदार कोतवालांना पाडण्यात डॉ. कुंभार्डे यांचा वाटा मोठा असल्याने त्यांचे उट्टे काढण्यासाठी कोतवाल पूर्णपणे ताकीदीनिशी प्रयत्न करणार आहे. या गटात शिवसेनेचे शांताराम ठाकरे हेही रिंगणात उभे आहेत. त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागून आहे. वडाळीभोई गटात राष्ट्रवादीच्या ज्योती बाळासाहेब धाकराव, भाजपाच्या अर्चना अनिल जाधव, शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव, भारतीय कम्युनिस्ट पक्ष अलका महेंद्र गवारे यांच्यात चौरंगी लढत होत असून, भाजपाचे तिकीट न मिळाल्याने रुपाबाई कैलास केदारे, अनुसया हिरामण बोढारे यांनी अपक्ष उमेदवारी केली असून, येथेही बंडखोरी झाल्याचे चित्र दिसत आहे. वडनेरभैरव गटात कॉँग्रेसच्या शोभा कडाळे, भाजपाच्या मंगल बाळकृष्ण वाघ, शिवसेनेच्या अलका रामदास गांगुर्डे, कम्युनिस्ट पक्षाच्या संगीता महाले यांच्यात चौरंगी लढत होत असून, कम्युनिस्ट पक्षाच्या सुनीता वाघ यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनीही बंडखोरी केली, तर वाहेगावसाळ व तळेगावरोही गणात स्थानिक विकास आघाडी करून महेश न्याहारकर (राष्ट्रवादी), अॅड. कल्पना निंबाळकर (भाजपा महिला आघाडी), अनिल काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस) यांना तिकिटे न मिळाल्याने बंडखोरी केल्याने ही कोणाच्या पथ्यावर पडते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.