सर्वांच्या भुवया उंचावल्या! सकाळी निकाल, सायंकाळी ठाकरे गटाच्या आमदार पुत्राच्या लग्नाला मुख्यमंत्री शिंदेंची हजेरी
By श्याम बागुल | Published: May 11, 2023 08:23 PM2023-05-11T20:23:38+5:302023-05-11T20:25:08+5:30
समर्थकांची जोरदार घोषणाबाजी : नववधू-वराला ‘राजकीय’ आशीर्वाद
नाशिक : राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे शिक्षक आ. किशोर दराडे यांच्या पुत्राच्या लग्नानिमित्त गुरुवारी (दि.११) नाशिकला हजेरी लावली.
यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे नेते तथा ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हेदेखील होते. मुख्यमंत्री शिंदे यांचे विवाहस्थळी आगमन होताच त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांचे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने थेट विवाहस्थळी आगमन झाले.
गुरुवारी राज्य सरकारच्या सत्तेचा फैसला सर्वोच्च न्यायालयात होणार असल्याने शिंदे यांच्या नाशिक दौऱ्याविषयी शासकीय यंत्रणेत अनिश्चितता व्यक्त केली जात होती. परंतु बुधवारी (दि.१०) रात्रीच शिंदे यांचा शासकीय दौरा निश्चित झाल्याने त्यादृष्टीने तयारी करण्यात आली होती. पाच वाजता विवाहस्थळी गिरीश महाजन यांच्या समवेत शिंदे यांचे आगमन होताच आ. नरेंद्र दराडे, किशोर दराडे बंधूंनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांनी वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. काही वेळ थांबल्यानंतर शिंदे पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना झाले.