नाशिक : कोरोनाशी मुकाबला ही केवळ शासनाची किंवा महानगरपालिकेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाने त्यात योगदान देणे आवश्यक आहे. कोरोनाशी यशस्वी लढा द्यायचा असेल तर सर्व गटतट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रितपणे झुंजावे लागेल. एकप्रकारे कोरोनाविरोधात आपण सारे जण प्रतिपक्ष असाच हा सामना करावा लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.मिशन झीरो नाशिक या महत्वाकांक्षी आणि एकात्मिक कृती योजनेला भारतीय जैन संघटना व नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने मंगळवारपासून (दि. २१) प्रारंभ करण्यात आला. त्याअंतर्गत कोरोनाविरु ध्दच्या लढाईत यशस्वी मुकाबला करण्यासाठी २० मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनचा शुभारंभ भालेकर मैदानावर पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याआधी महाकवी कालीदास कलामंदिरात झालेल्या शुभारंभाच्या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर खासदार डॉ. भारती पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, भारतीय जैन संघटनेचे प्रमुख शांतीलाल मुथा, जगदीश पाटील, सतीश सोनवणे, प्राचार्य प्रशांत पाटील, नंदकिशोर सांखला, चेतन बोरा, गिरीश पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री भुजबळ यांनी जोपर्यंत कोरोनावर प्रभावी लस किंवा हमखास गुणकारी ठरु शकणारे औषध सापडत नाही, तोपर्यंत कोरोनाशी लढा सुरु ठेवावा लागणार असल्याचे सांगितले. कोरोनाला घाबरुन चालणार नसून सर्व अत्याधुनिक साधनसामग्रीचा उपयोग करुन अधिकाधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी लागणार आहे. अनेकांना सेवा मिळाली मात्र काही मोजक्याच लोकांना सेवा मिळाली नाही, बेड मिळाला नाही तर यंत्रणेला नावे ठेवणे साहजिक आहे. त्यामुळे कुणालाच नावे ठेवण्याची संधी मिळू देऊ नका, असेदेखील भुजबळ यांनी सांगितले.त्याआधी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मिशन झीरोसाठी योगदान देणारी भारतीय जैन संघटना तसेच अन्य सर्व सामाजिक संघटनांच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करुन आभार मानले.आपण सर्वांनी कोरोनाबाबतचे नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे सांगितले. तर भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी कोरोनाची भीती संपुष्टात आणणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्याच्या मनात कोरोनाची भीती असते, तोच कोरोनाला बळी पडतो. त्यामुळे सर्वांची मने जोडतानाच नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नंदकिशोर सांखला यांनी तर आभार दीपक चोपडा यांनी मानले.
---
भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले की, जैन संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ४९ ठिकाणी फिरत्या रुग्णालयाच्या माध्यमातून तपासणी मोहीम राबविण्यात येत असून अद्याप पर्यंत १६ लाख रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे. लॉकडाऊन संपल्यांनातर कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने ‘मिशन झिरो’ ही संकल्पना तयार करून काम करण्यात येत आहे. आता कोरोनसह आपल्याला जगायचं यासाठी तशी मानसिकता तयार करून उपाययोजना करायला हव्या यासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढे यायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.