थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप
By Admin | Published: January 15, 2015 12:22 AM2015-01-15T00:22:39+5:302015-01-15T00:22:50+5:30
पंचवटी विभागीय कार्यालय : थकबाकीदारांच्या मिळकती करणार जप्त
पंचवटी : थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरावी यासाठी पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने सुमारे अडीच हजार थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप करण्यात आले असून, वेळेत थकबाकी न भरणाऱ्यांना वॉरंट बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई पंचवटी विभागीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येणार आहे.
पंचवटीत जवळपास ८० हजार मिळकती आहेत. मनपा प्रशासनातर्फे पंचवटीत यंदा जवळपास ३९०० थकबाकीदारांना सूचनापत्रांचे वाटप केले जाणार असून, त्यापैकी अडीच हजार थकबाकीदारांना सूचनापत्र वाटप करण्यात आले आहे. महापालिकेची थकबाकी भरावी यासाठी सुरुवातीला सूचनापत्रांचे वाटप व त्यानंतरही संबंधितांनी थकबाकी न भरल्यास त्यांना वॉरंट बजावून त्यांच्या मिळकती जप्त करण्याची कारवाई केली जाणार आहे. पाणीपट्टी थकबाकीदारांनी वेळेत पाणीपट्टी न भरल्यास त्यांच्या नळजोडण्या खंडित केल्या जाणार आहेत. नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम वेळेत भरावी यासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी विनवणी केली जाते; मात्र तरीदेखील काही थकबाकीदार वेळेत थकबाकी जमा करीत नसल्याने त्यांच्याविरुद्ध ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपा प्रशासनाकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी वेळेत कर भरून मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पंचवटी विभागीय अधिकारी ए. पी. वाघ यांनी केले आहे. (वार्ताहर)