नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात गेल्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू असल्याने म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने भोजापूर खोरे परिसरातील नळवाडी-पांढरीवस्तीकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पांढरीवस्तीकडे जाण्यासाठी पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र पूरच्या पाण्याने सदरचा रस्ता वाहून गेल्याने या वस्तीचा गावाशी संपर्क तुटला आहे.पश्चिम पट्ट्यात व म्हाळुंगी नदीच्या उगम क्षेत्रावर सुरू असलेल्या संततधारेमुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. म्हाळुंगी नदीला तिसऱ्यांदा महापूर आल्याने शुक्रवारी सकाळी भोजापूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे पूराचे पाणी कासारवाडी, चास, नळवाडीमार्गे संगमनेर तालुक्याच्या हद्दीत शनिवारी पाहचले आहेत. नळवाडी गावालगत पांढरीवस्ती असून पावसाळ्याच्या दिवसात नेहमीच येथील फरशी पूलाचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. तीन वर्षापूर्वी झालेल्या पूरात येथील फरशी पूलाची दूरवास्था झाली होती.त्यामुळे आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या पाठपुराव्यामुळे नवीन पुलाचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी सुरू केले आहे. त्यामुळे पांढरीवस्ती, चिकणी, डोंगरगाव आदी भागाकडे जाण्यासाठी पुलाजवळच पाईप टाकून त्यावर मुरूम व माती टाकून पर्यायी मुरूमाचा पकका रस्ता तयार करण्यात आला होता.म्हाळुंगी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने भोजापूर धरणाच्या सांडव्याद्वारे १८०० क्यूसेसने पाणी नदीपात्रातून वाहत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पूराच्या तडाख्यात मुरूमाचा रस्ता पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे पांढरीवस्तीकडे जाण्याचा संपर्क तुटला आहे. पांढरीवस्तीकडे अंदाजे १२०० ते १३०० च्या आसपास लोकसंख्या असून नळवाडी गावात जाण्यासाठी शेतकरी व ग्रामस्थ यांना एकमेव हाच रस्ता असल्याने या मार्गावर नेहमी वर्दळ असते. नळवाडी गावात येण्यासाठी पांढरीवस्ती येथील ग्रामस्थांना कासारवाडी, चास मार्गे दहा किलोमीटर अंतर कापून यावे लागत आहे.
म्हाळुंगी नदीच्या पूराने पर्यायी रस्ता वाहून गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 6:38 PM