रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2021 11:15 PM2021-06-13T23:15:50+5:302021-06-14T00:25:15+5:30
येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
रविवारी, (दि.१३) येथील शासकीय विश्रामगृहात येवला, निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामांची आढावा बैठक पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
कोरोना रुग्णांची संख्या बर्याच प्रमाणात कमी झालेली आहे. मात्र, अद्यापही आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजना व कोरोना तपासणी नियमित सुरू ठेवावी. रुग्णसंख्या कमी झाली, म्हणून गाफील राहू नये, अशा सूचना संबंधित अधिकार्यांना यावेळी भुजबळ यांनी दिल्या, तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांट आहे, त्या ठिकाणी तातडीने स्वतंत्र ट्रान्सफार्मर बसविण्याचेही त्यांनी आदेश दिले.
दरम्यान, येवला शहर व तालुक्यात रखडलेल्या कामांचाही त्यांनी आढावा घेतला. बैठकीस नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, नगरपालिका गटनेते प्रवीण बनकर, येवल्याचे प्रांत अधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांत अधिकारी डॉ.अर्चना पठारे, पालिका मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपअभियंता उन्मेष पाटील, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शिवसृष्टीच्या जागेची पाहणी
येवला शहरात शिवसृष्टी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाची निविदाही काढण्यात आली असून, लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुजबळ यांनी शिवसृष्टी जागेची पाहणी करून, या ठिकाणी करावयाच्या कामांबाबत नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना दिल्या.