लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मे महिन्यात उन्हाच्या तडाख्यात वाढ होताच पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्यातील धरण साठ्यात लक्षणीय घट होऊ लागली असून, जेमतेम ३४ टक्के साठाच शिल्लक राहिला आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा साठा समाधानकारक असून, गेल्या वर्षी मेअखेरीस फक्त १० टक्केच पाणी धरणांमध्ये शिल्लक होते.
नाशिक जिल्ह्यातील धरणांची साठवण क्षमता ६५,५१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सर्वत्र सरासरीपेक्षाही अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहिली होती. त्यामुळे आॅक्टोबरअखेर काही धरणांचे दरवाजे उघडून देत पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी नदी, नाल्यांना महापुराची परिस्थिती निर्माण झाली तर विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ झाली होती. नोव्हेंबर महिन्यांपर्यंत पावसाची हजेरी कायम राहिल्याने जमिनीखालच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे यंदा दरवर्षापेक्षा उशिराने जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. तथापि, धरणांमध्ये पाणी भरपूर असले तरी, धरणाच्या पाण्यावर असलेले इतर आरक्षणाचा विचार करता यंदा मे महिन्यात फक्त ३४ टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. हवामान खात्याने यंदाही पाऊस समाधानकारण पडणार असल्याचे भाकित केले, परंतु पाऊस काहीसा लांबणीवर पडणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी जपून वापरावे लागणार आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ३८ टक्के जलसाठा असून, गंगापूर धरणात ४७ टक्केपाणी आहे. सध्या कश्यपि व गौतमी गोदावरीतून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आहे. दारणा धरणात ६६ टक्के जलसाठा आहे, तर ओझरखेडमध्ये ४१, पालखेड १६, भावली २०, वालदेवी २२, चणकापूर २७, हरणबारी ३३, गिरणा ३४ टक्केअशाप्रकारे प्रमुख धरणांमध्ये पाणी शिल्लक आहे. गेल्या वर्षी मात्र याचवेळी जिल्ह्यातील दहा धरणांनी तळ गाठला होता. यंदा मात्र अद्याप तशी वेळ आलेली नाही.