सुरगाणा : तालुक्यातील मनखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०८ क्रमांकावर रु ग्णसेवा देणारी रुग्णवाहिकाच गेल्या एक महिन्यापासून नादुरु स्त असून वेळेवर फोन देखील लागत नसल्याने या भागातील गर्भवती मातांसह अन्य रूग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णवाहिकाच आजारी पडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात मनखेडसह जायविहीर, भाटविहीर, आंब्याचा पाडा, रानपाडा, वडपाडा, वांजुळपाडा, नडगदरी, सादुडणे, हेमाडपाडा, मुरु मदरी, ओरंबे, दूमी, मांगले, कवेली, पंगारबारी, गळवड, शिरिषपाडा आदी २० गावे येतात. हा संपूर्ण परिसर दुर्गम व डोंगराळ भागाचा आहे. या परिसरात मुलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत मनखेड येथील आरोग्य केंद्रात असलेली रूग्णवाहिकाच एक महिन्यापासून आजारी असल्याने गंभीर अवस्थेतील रूग्णांची हेळसांड होत आहे. विशेषत: गर्भवती मातांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच रात्रीचे वेळी रुग्णवाहिकेसाठी फोन न लागल्याने जायविहीर येथील एका गर्भवती मातेला मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी खासगी वाहनातून जावे लागले. ग्रामीण-दुर्गम भागात प्रत्येक वेळी खासगी वाहन उपलब्ध होईलच याची खात्री नाही. त्यामुळे मनखेड प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तत्काळ दुरुस्त करावी अन्यथा पर्यायी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्याची तसेच फोनची सुविधा देखील सुरळीत ठेवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मनखेड आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाच आजारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 5:48 PM
ग्रामस्थ संतप्त : पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
ठळक मुद्देपरिसरात मुलभूत सुविधा पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत.