नाशिकमध्ये आनंद भाटे यांच्या स्वराविष्कारात श्रोते तल्लीन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 12:29 PM2017-10-21T12:29:21+5:302017-10-21T12:29:51+5:30
नाशिककरांनी आज भाऊबीजेच्या पहाटे प्रख्यात शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या स्वरांचा अविष्कार अनुभवला.
नाशिक- नाशिककरांनी आज भाऊबीजेच्या पहाटे प्रख्यात शास्त्रीय गायक आनंद भाटे यांच्या स्वरांचा अविष्कार अनुभवला.
नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत भर घालणाऱ्या पाडवा पहाट मैफिलीप्रमाणेच ठिकठिकाणी भाऊबीज पहाट कार्यक्रम होऊ लागले असून आज गंगापूररोडवरील स्व. प्रमोद महाजन उद्यानात आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य असलेले आनंदगंधर्व आनंद भाटे यांच्या गायनात श्रोते तल्लीन झाले.
विविध मान्यवरांचे किस्से गप्पांच्या ओघात मांडताना सजलेल्या या मैफिलीत वद जाऊ कुणाला शरण ग या पदासह जोगीया मोरे घर आये या ललत रागातील तीन तालातील बंदिशीसह विविध रचनांना यावेळी उत्स्फूर्त दाद लाभली. आमदार देवयानी फरांदे व भाजपा प्रवक्ते प्रा सुहास फरांदे आयोजित या कार्यक्रमात महापौर रंजना भानसी, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महिला बाल कल्याण विभागाच्या विनिता सिंगल, आमदार बाळासाहेब सानप, मनपा स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, नंदकिशोर भुतडा, डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी, लक्ष्मण सावजी, नितीन ठाकरे आदी मान्यवर उपस्थित आहेत.
भाभानगर येथील मैदानावर माजी आमदार वसंत गीते व उपमहापौर प्रथमेश गीते आयोजित भाऊबीज पहाट कार्यक्रमात संगीतकार संजय गीते व सारेगमपफेम आर्या आंबेकर आदींनी रंगत आणली आहे.