त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या कायकर्त्यांच्या प्रसांगावधनामुळे तालुक्यातील बर्ड्याचे पाडा येथील गंभीर अवस्थेतील अतितिव्र कुपोषित बाळाला जीवदान मिळाले आहे. अंधश्रद्धेला फाटा देत बाळावर तातडीने उपचार झाल्याने त्याचा जीव वाचला आहे.तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायतीच्या बर्ड्याचे पाडा येथील लचके कुटूंबियातील दीड वर्षाचे बाळ ज्ञानेश्वर हे गेल्या काही दिवसांपासून अतितीव्र कुपोषित झाले होते. त्याची तब्येतही अत्यंत गंभीर झाली होती. त्या बाळावर डॉक्टरांकडून औषधोपचार न करता त्याला काहीतरी भूतबाधा झाली म्हणून भगताकडे नेले जात होते. दिवसेंदिवस बाळाची तब्येत जास्तच खालावत चालली होती. तरी देखील या बाळाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत नव्हते, याबाबतची माहिती श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली. त्यांनी तात्काळ त्या बाळाला त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले मात्र तेथे देखील त्या बाळाची आजी म्हणत होती की, बाळाला दवाखान्यात फरक पडणार नाही. त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रु ग्णालयात कोणालाही न विचारता गुपचूप बाळाला घेऊन आजी पळ काढत होती. परंतु त्यांना न जुमानता संघटनेचे सचिव तानाजी शिद यांनी जबरदस्तीने त्या बाळाला पुनश्च हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी सांगितले की बाळाची तब्येत चिंताजनक आहे, ज्ञानेश्वरला त्वरित नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल करावे लागेल. अखेर शिद यांनी स्वत: जबाबदारी घेत बाळाला १०८ च्या रु ग्ण वाहिकेतून नाशिक जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. कार्यकर्ते बाळाच्या सोबत जिल्हा रु ग्णालयात थांबले होते. बाळावर उपचार सुरु केले गेले. तब्बल १३ दिवसांत बाळाला बरे वाटु लागले, त्यानंतर आणखी तीन ते चार दिवस बाळाला आहार दिला. त्यामुळे ज्ञानेश्वर खेळू लागला, हसू लागला. त्यानंतर १७ व्या दिवशी बाळाला घरी आणले. विशेष म्हणजे बाळाला दाखल केल्यापासून संघटनेचे कार्यकर्ते रु ग्णालयात सतत त्या बाळाच्या उपचाराची काळजी घेत होते. ज्ञानेश्वर व त्याच्या आईच्या चेहऱ्यावर फुलले हसू पाहून सर्वांचे मन सुखावून गेले होते.
...अन् कुपोषित बाळाला मिळाले जीवदान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 2:26 PM