प्राणीप्रेम : नाशिकच्या १८ मोकाट श्वानांच्या पिलांना लाभले पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 07:52 PM2018-01-07T19:52:11+5:302018-01-07T19:57:28+5:30
‘आवास’ संस्थेच्या वतीने दीड वर्ष वयोगटातील श्वान मोफत इच्छुक श्वानप्रेमींकडे संगोपनासाठी सोपविले. दिवसभरात १८ बेवारस मोकाट श्वानांच्या पिलांना संगोपनासाठी पालक लाभले.
अझहर शेख, नाशिक : प्राण्यांवर प्रेम असलेल्या नागरिकांची कमी नाही; मात्र या प्रेमापोटी रस्त्यावर आढळून आलेल्या श्वानांना दत्तक घेत एखाद्या विदेशी जातीच्या श्वानाप्रमाणे जिवापाड प्रेम करून संगोपन करणाºयांची संख्या अत्यल्प आहे. याउलट मोकाट कुत्र्यांविषयी ओरड करणाºयांची संख्या कितीतरी पटीने जास्त असताना मात्र काही नाशिककर रविवारी (दि.७) यास अपवाद ठरले. एकूण १८ मोकाट श्वानांना ‘आवास’ प्राणीप्रेमी संस्थेमार्फत दत्तक घेत त्यांनी वेगळा पायंडा पाडला.
भटकी कुत्री व उपद्रव हे जणू समीकरणच झाले आहे. रस्त्यावर मोकाट कुत्रा दिसला की आपसूकच त्याच्या दिशेने दगड भिरकावला जातो; मात्र त्याचा फटका निरागस दिसणा-या त्यांच्या पिलांनाही बसतो आणि ब-याचदा त्यांचा जीवही जातो. अशाच काही पिलांना आश्रय देण्यासाठी नाशिककर सरसावल्याचे चित्र यावर्षीदेखील ‘पेट टुगेदर’च्या जत्रेत पहावयास मिळाले. विविध प्रकारचे देशी-विदेशी श्वान, अश्व, पक्षी यांची भरलेली जत्रा आणि या जत्रेत त्यांच्या मालकांकडून केली जाणारी देखभाल व काळजी बघता सर्वच भेट देणारे अवाक् झाले. या जत्रेत आलेल्या १८ श्वानप्रेमींनाही श्वानांचा लळा लागला तो भारतीय जातीच्या मोकाट कुत्र्यांच्या पिलांचा. ‘आवास’ संस्थेच्या वतीने दीड वर्ष वयोगटातील श्वान मोफत इच्छुक श्वानप्रेमींकडे संगोपनासाठी सोपविले. दिवसभरात १८ बेवारस मोकाट श्वानांच्या पिलांना संगोपनासाठी पालक लाभले. यावेळी आवासचे गौरव क्षत्रिय व त्यांच्या सहका-यांनी भटक्या कुत्र्यांविषयी उपस्थितांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोकाट श्वानांची पिले दत्तक घेणा-या नाशिककरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या वतीने १८ श्वानप्रेमींची नावे, पत्ता, संपर्क क्र मांक आदी माहितीची नोंद करण्यात आली. या सर्व नागरिकांना रस्त्यावरची श्वानांची पिले पाळताना घ्यावयाची काळजी, आवश्यक लसीकरण, औषधोपचाराविषयी मोफत माहिती व सल्ला पशुवैद्यकांमार्फत दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
---इन्फो--
दोन वर्षांत २८ पिलांना मिळाले पालक
मागील वर्षी पेट टुगेदरमध्ये आवास संस्थेकडून मोकाट श्वानांची दहा पिले नाशिककरांनी दत्तक घेतली होती. यावर्षी ही संख्या जवळपास दुप्पट झाली. १८ नाशिककरांनी मोकाट श्वानांची पिले दत्तक घेतली. एकूणच दोन वर्षांत २८ पिलांना पालक लाभले असून, हे शुभ वर्तमान मानले जात आहे.