कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने ‘गोदावरी गौरव’ पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:32 PM2018-01-20T14:32:55+5:302018-01-20T14:34:01+5:30
१० मार्चला वितरण : सत्यशील देशपांडे, अमोल पालेकर, सुभाष अवचट यांचा समावेश
नाशिक - येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने दर एक वर्षाआड देण्यात येणा-या ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि.२०) नाशकात पत्रकारपरिषदेत केली आहे. यावर्षी, गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि नुकत्याच झालेल्या कमला मिल दुर्घटनेत अडकलेल्यांना जीवदान देणारे सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. येत्या १० मार्चला कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी मविप्रच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
१९९२ पासून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने विविध सहा प्रकारांमध्ये उल्लेखनिय कामगिरी बजावणा-या मान्यवरांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जात आहे. यंदाचे पुरस्काराचे चौदावे वर्ष आहे. दर एक वर्षाआड या पुरस्काराचे वितरण होते. २१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी, गायन या प्रकारात गायक, संगीततज्ज्ञ, रचनाकार पंडित सत्यशील देशपांडे, लोकसेवा प्रकारात मेळघाट येथे आदिवासी जमातीत राहून सेवा बजावणारे दाम्पत्य डॉ. रविंद्र आणि स्मिता कोल्हे, नाट्य आणि चित्रपट प्रकारात मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अमोल पालेकर, ज्ञान या प्रकारात मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्र या प्रकारात चित्रकार सुभाष अवचट तसेच मुंबईत नुकत्याच घडलेल्या कमला मिल आगीच्या दुर्घटनेत सुमारे २०० लोकांचा जीव वाचविणारे पोलिस आणि गृहरक्षक दलाचे जवान सुदर्शन शिंदे व महेश साबळे यांना ‘गोदावरी गौरव’ने सन्मानित केले जाणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या मान्यवरांना कृतज्ञतेचा नमस्कार केला जाणार आहे. यापूर्वी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणा-या जनस्थान आणि गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा मुंबईत करण्याचा पायंडा विश्वस्तांनी पाडला होता. यंदा मात्र, तात्यासाहेबांच्या गावीच पुरस्कारांची घोषणा करण्याचे उशिराचे भान विश्वस्तांना आले. पत्रकार परिषदेप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त संजय पाटील, आमदार हेमंत टकले, लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर आदी उपस्थित होते.
यंदा थोरात सभागृहात वितरण
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने जनस्थान असो अथवा गोदावरी गौरव या पुरस्कारांचे वितरण महाकवी कालिदास कलामंदिरात समारंभपूर्वक करण्यात येते. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने यंदा कालिदास ऐवजी मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ६ वाजता वितरण सोहळा होणार आहे.