नाशिक- रविवारी आलेल्या माघी जयंतीच्या पार्श्वभूमीवर उंटवाडीतील लक्षिका मंगल कार्यालयाच्या सभागृहात नाशिकचे कलाकार निलेश देशपांडे यांनी श्रीगणेशाची निरनिराळी १२५ रुपे रेखाटत विश्वविक्रमात त्याची नोंद केली आहे. या विक्रमाद्वारे नाशिकच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ६२५ मिनीटात त्यांनी ही किमया साधली आहे. प्रत्येक गणपतीसाठी ५ मिनीटांचा कालावधी घेत त्यांनी २बाय ४ फुट आकारात गणरायाची विविध रुपे रंगांची उधळण करीत रेखाटली आहेत. महिला भजनी मंडळाचा ताल, गणपती अथर्वशिर्ष पठण अशा मंगलमय वातावरणात त्यांनी आपल्या विश्वविक्रमाची कलाकृती साकारली.रांगोळीकार देशपांडे यांनी बुधवारी (दि.१७) ५० फुट बाय ५० फुटांची महागणपतीची महारांगोळी साकारली होती. या रांगोळीच्या कलाकृतीची ‘वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘जीनीअस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’ ने नोंद घेतली आहे.त्याच्या पुढिल पाऊल म्हणून गुरुवारी महिला मंडळांच्या भजनाच्या तालावर त्यांनी ६२५ मिनीटात १२५ गणपती साकारले. लंबोदर, गजवक्र, वक्रतुंड विनाय, एकदंत, भालचंद्र अशा विविध रुपातील गणपतींची चित्रे रेखाटण्यात आली आहे. या उपक्रमासाठी त्यांना योगीनी देशपांडे, वृंदा लव्हाटे, योगिता खांडेकर, मयुर पुराणिक, अजिंक्य मोहोळकर, निर्जला देशपांडे यांच्यासह सोनल दगडे, शुभांगी तिरोडकर, अनिल लोढा आदिंचे सहकार्य लाभले. याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह त्यांना परिक्षकांनी बहाल केले.