विरोध झुगारत स्मशानभूमीत अंत्यविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:35 AM2017-11-05T00:35:34+5:302017-11-05T00:35:34+5:30
येथील उंटवाडी स्मशानभूमीची दुरुस्ती करू नये तसेच याठिकाणी अंत्यविधी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी सदरची जागा ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीसाठी राखीव असल्याने शनिवारी (दि.४) याठिकाणी विरोध झुगारून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.
सिडको : येथील उंटवाडी स्मशानभूमीची दुरुस्ती करू नये तसेच याठिकाणी अंत्यविधी करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला असला तरी सदरची जागा ही पूर्वीपासूनच स्मशानभूमीसाठी राखीव असल्याने शनिवारी (दि.४) याठिकाणी विरोध झुगारून लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला. येथील प्रभाग क्रमांक २५ मध्ये समाविष्ट असलेल्या उंटवाडी येथील स्मशानभूमीच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी नगरसेवक हर्षा बडगुजर यांनी त्यांच्या नगरसेवक निधीची तरतूद केली आहे. परंतु सदरची स्मशानभूमी ही गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून, सध्या याठिकाणी कोणत्याही प्रकारचे अंत्यविधी केले जात नाही. तरीदेखील मनपाने याठिकाणी दुरुस्तीकामासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर केला असून, यास परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. स्मशानभूमीलगत मोठ्या प्रमाणात नागरीवस्ती वाढलेली असल्याने यास विरोध करण्यात येत असून, मनपाने येथील निधी हा प्रभागातील इतर विकासकामांसाठी वापरावा तसेच यानंतरही मनपाने स्मशानभूमी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यास यास विरोध केला जाईल, असे निवेदन भाजपा पक्षाचे नगरसेवक भाग्यश्री ढोमसे व राकेश ढोमसे यांनी नागरिकांनी बरोबर घेत विभागीय अधिकारी सुनीता कुमावत यांना निवेदन दिले होते, तर दुसरीकडे परिसरातील ग्रामस्थांनी शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर व हर्षा बडगुजर यांना बरोबर घेत याठिकाणी स्मशानभूमीची दुरुस्ती करण्यासाठी साकडे घातल्याने हा वाद चिघळला होता. १९८६ पासून सदरची जागा ही स्मशानभूमीची असल्याने याठिकाणी अंत्यविधीस कोणीही विरोध करू नये, असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले होते. शनिवारी (दि.४) लिंगायत समाजाच्या वतीने अंत्यविधी करण्यासाठी गेले असता स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शविला. त्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली.
स्मशानभूमी दुरुस्तीचा मार्ग मोकळा
मनपाने याठिकाणी स्मशानभूमी दुरुस्तीकामासाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर केला असून, गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी वाद चिघळला असल्याने दुरुस्तीचे काम रखडले होते. आज याठिकाणी लिंगायत समाजाच्या वतीने पोलीस बंदोबस्तात अंत्यविधी केल्याने अखेरीस स्मशानभूमीच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.