नाशिक : रेव्हरंट नारायण टिळक आणि स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू, प्रगल्भ साहित्यिक, व्यासंगी व साक्षेपी समीक्षक अशोक देवदत्त तथा आप्पासाहेब टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २९ मे २०२१ पासून सुरुवात होत आहे. नाशिकचा चालता बोलता संदर्भकोश असलेले आप्पासाहेब ८९ वर्षे जगले. ते शतायुषी राहिले असते तर आजच्या बिकट परिस्थितीचा वेध त्यांनी आपल्या परखड लेखणीतून नक्कीच घेतला असता.आप्पा टिळक हे एक अजब रसायन होते. जो त्यांच्या संपर्कात गेला तो प्रगल्भ होत राहिला. मराठी वाङ्मयात आप्पांनी दिलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. एक अभ्यासू, चिकित्सक आणि संशोधनात्मक वृत्ती सर्वांगी भिनलेल्या अप्पासाहेब यांनी रेव्ह. नारायण वामन आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या प्रकाशित-अप्रकाशित साहित्याचा घेतलेला वेध हा मराठी वाङ्मयात अमूल्य असा ठेवा आहे. त्यातूनच स्मृतिचित्रेची अभिनव आवृत्ती आणि रेव्ह. टिळक यांच्या विषयीची ‘चालता बोलता चमत्कार’ ही चरित्रात्मक कादंबरी वाचकांसमोर येऊ शकली. आप्पा यांच्यातील स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणा हा नाशिककरांनी नेहमीच अनुभवला आहे. जुना त्र्यंबकनाका या चौकाचे लक्ष्मीबाई टिळक असे नामकरण होऊनही त्यात महापालिकेच्या कारभाऱ्यांनी सुशोभीकरणच्या नावाखाली केलेला बदल आप्पांना अजिबात रुचला नाही. त्यासाठी त्यांनी महापालिकेचे अनेकदा उंबरे झिजवले; परंतु महापालिकेने बोळवणच केली. नाशकात भरलेल्या ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये आप्पांनी जाहीर व्यासपीठावर सत्कार नाकारत महापालिकेच्या पराक्रमाचे वाभाडे काढले होते. त्यावेळी व्यासपीठावरील मान्यवर स्तब्ध झाले होते.आप्पांचे पहिले पुस्तक ‘सावल्या’ हे वयाच्या १९ व्या वर्षी आणि शेवटचे बाविसावे पुस्तक टक्करमाळ हे वयाच्या ८५ व्या वर्षी प्रकाशित झाले. या प्रवासात त्यांनी कवितासंग्रह, कुमारवाङ्मय, ललित, चरित्रात्मक कादंबरी, वैचारिक, समीक्षा, गद्य आणि संपादन असे वाङ्मयाचे सर्व प्रकार हाताळले. संपादनातील काटेकोरपणा हा त्यांचा विशेष गुण होता. आप्पा आपल्या दर वाढदिवशी पुस्तक प्रकाशित करत असत. आज ते हयात असते तर आजच्या कोरोनाच्या अवघड आणि जीवघेण्या कालखंडाचा आपल्या खास शैलीत त्यांनी परामर्श घेतला असता.अप्पांचा पत्रव्यवहार हासुद्धा एक अमूल्य खजिना आहे. अप्पांमध्ये एक प्रचंड मिश्किल माणूस दडलेला होता. सार्वजनिक वाचनालयाच्या दरवर्षी होणाऱ्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात पाठीमागून अप्पा आणि वसंतराव जहागीरदार यांची टिपणी हासुद्धा एक आनंदाचा भाग असायचा. अप्पा उत्तम शिक्षकही होते. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. व्याकरणाच्या बाबतीत तर प्रचंड सजकता होती. अप्पा उत्तम कलाकार होते. त्यांचे हस्ताक्षर म्हणजे एक छापील नमुना वाटावा, असे सुंदर व मोहक होते. नाशिकच्या इतिहासाचे अप्पा एक चालता बोलता संदर्भकोश होते. अशी मंडळी आता दुर्मीळ झाली आहेत. आज अप्पांच्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. अप्पांसारख्या निरलस आणि व्यासंगी लेखकाच्या स्मृतींचा दीप सदैव प्रज्वलित ठेवणे हीच अप्पासाहेब यांना आदरांजली आणि अभिवादन ठरेल.आप्पांची बीडीबी अन् मान्यवरांचा स्वाक्षरी संग्रहआप्पा त्यांच्या बीडीबी म्हणजे बर्थ डे बुकनेही सर्वांना सुपरिचित होते. एका छोटेखानी जाडजूड वहीत अप्पांना जे भेटले अथवा ज्यांना आप्पा भेटले त्यांच्या स्वाक्षऱ्यांचा खजिना होता. अतिशय प्राणपणाने आप्पांनी ही वही जपली. ‘लोकमत’मध्ये पुरवणीत या स्वाक्षऱ्या दर आठवड्याला प्रकाशित केल्या गेल्या तेव्हा या बीडीबीचा जवळून परिचय झाला. आप्पांशी गप्पा म्हणजे हा एक आणखी एक आनंदाचा भाग असायचा. त्यातून अनेक संदर्भांची उकल व्हायची.
आप्पासाहेब, तुम्ही शतायुषी राहिला असतात तर...!
By धनंजय वाखारे | Published: May 29, 2021 12:55 AM
रेव्हरंट नारायण टिळक आणि स्मृतिचित्रेकार लक्ष्मीबाई टिळक यांचे नातू, प्रगल्भ साहित्यिक, व्यासंगी व साक्षेपी समीक्षक अशोक देवदत्त तथा आप्पासाहेब टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाला २९ मे २०२१ पासून सुरुवात होत आहे. नाशिकचा चालता बोलता संदर्भकोश असलेले आप्पासाहेब ८९ वर्षे जगले. ते शतायुषी राहिले असते तर आजच्या बिकट परिस्थितीचा वेध त्यांनी आपल्या परखड लेखणीतून नक्कीच घेतला असता.
ठळक मुद्देजन्मशताब्दी वर्षास प्रारंभ : नाशिकच्या शांतीसदनमध्ये आठवणींचा खजिना