लग्नाच्या "टाळी"ला आले, अन् घडली राजकीय "टाळी"ची चर्चा !
By किरण अग्रवाल | Published: March 6, 2021 11:15 PM2021-03-06T23:15:40+5:302021-03-07T01:10:30+5:30
अन्य सारे पक्ष नाशिक महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागलेले असल्याने मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या यंदाच्या नाशिक दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते; पण चर्चांखेरीज काय साधले हा प्रश्नच ठरावा.
सारांश
राजकीय नेत्यांभोवती होणारी गर्दी हल्ली त्यांच्या विचारांच्या अनुसरणापेक्षा सेल्फीच्या नादातूनच अधिक होताना दिसते. त्यात राज ठाकरे यांच्यासारखे गर्दीशी समीकरण जुळलेले नेते असले तर विचारायलाच नको. त्यामुळे एका खासगी विवाह समारंभाच्या निमित्ताने नाशकात आले असतानाही नेहमीप्रमाणे त्यांच्या स्वागतासाठी गर्दी जमलेली दिसून आली. एका पाकीटमाराकडून या गर्दीचा लाभ उचलला गेल्याचे पहावयास मिळाले; भाजप नेत्याच्या कथित भेटीने ह्यटाळीह्णची चर्चाही रंगली, परंतु पक्षबांधणी व प्रोत्साहनाच्या दृष्टिकोनातून राज यांच्या या दौऱ्याचा पक्षाकडून लाभ घेतला गेल्याचे दिसून येऊ शकले नाही.
पक्षनेत्यांच्या दौऱ्याप्रसंगी स्वागतासाठी होणारी गर्दी ही त्या पक्षसंघटनेतील उत्साहाचे निदर्शक मानली जाते हे खरे; पण ती टिकवून ठेवायची अगर पक्षाच्या उपयोगितेत आणायची तर या समर्थकांना काहीतरी निश्चित कार्यक्रम दिला जाणे गरजेचे असते. तसे मनसेत अपवादानेच होताना दिसते. मुळात सुमारे वर्ष-सव्वावर्षाच्या अंतराने राज ठाकरे यांचा हा नाशिक दौरा झाला, त्यामुळे तो खासगी कारणासाठी असला तरी खुद्द त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. बरे, कोरोनाच्या निर्बंधांमुळे त्यांनी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची जाहीर बैठक टाळली, असेही म्हणता येऊ नये. कारण तशी भीती ते स्वतः बाळगत नसल्याने निर्बंधानुसार मास्क न घालताच ते गर्दीला सामोरे गेले; उलट ठाकरे यांनीच मास्क घातला नसल्याचे बघून इतरांनी आपल्या चेहऱ्यावरचे मास्क हटवले, त्याची चर्चा घडून आली. या हॉटेलात भाजप नेतेही मुक्कामी होते. त्यामुळे एका स्थानिक भाजप पदाधिकाऱ्याने ठाकरे यांची भेट घेतल्याची आवई उठून भाजप-मनसेच्या टाळीची चर्चाही घडून आली.
अर्थात, नाशिक महापालिकेत तशीही या दोन्ही पक्षांची टाळी लागलेली आहेच. शिवाय आगामी निवडणुकीसाठी अधिकृतपणे काही व्हायचे तर ते मुंबई मुक्कामी व वरिष्ठ नेत्यांच्या भेटीतून होईल. स्थानिकाच्या भेटीला त्यात ना कसले मत, ना महत्त्व. पण त्याच्याही चर्चा घडून आल्या. म्हणजे गर्दी झाली, लग्नाच्या टाळीला येऊन उगाच राजकीय टाळीची चर्चाही झाली; पण प्रश्न कायम राहिला तो म्हणजे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या या दौऱ्याचा पक्षाला म्हणून किती लाभ घेतला गेला?
गेल्या पंचवार्षिक कारकिर्दीत नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ता भूषवून झाली आहे. सद्य:स्थितीत महापालिकेत या पक्षाचे तितकेसे बळ उरलेले नाही; परंतु पक्षाचे पदाधिकारी आपले अस्तित्व दाखवून देण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे आवर्जून दिसते. पक्षातील प्रस्थापित पदाधिकारी व नवोदितांमध्ये अंतस्थ सामना बघावयास मिळतो कधी कधी; परंतु या पक्षाच्या आघाडीवरून होणारी धडपड नेहमी लक्ष्यवेधी ठरत आली आहे. संभाजीनगरचा विषय असो, की कर्नाटकच्या बसेसवर फलक लावणे; मनसैनिक स्वयंस्फूर्तीने कार्यरत असतात. त्यांना वरिष्ठांकडून जे दिशादर्शन होणे अपेक्षित आहे ते मात्र अपवादाने आढळते.
निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांना लोकसंपर्क व तयारीसाठी वेळ मिळावा म्हणून सातत्य आणि मार्गदर्शन अपेक्षित असते. आगामी निवडणुकीसाठीही आतापासूनच सक्रिय होणे गरजेचे असताना व अनायासे खासगी कार्यक्रमानिमित्त का होईना राज ठाकरे नाशकात आले असतानाही त्यादृष्टीने काही घडून येऊ शकले नाही म्हणून ते आश्चर्याचे म्हणायला हवे.
कसली वाट पाहिली जातेय...
गेल्यावेळी मनसे सोडून भाजपत गेलेले व निवडून आलेले अनेक नगरसेवक पश्चातापाच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जाते; परंतु त्यांना चुचकारण्याचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, भाजप आदी पक्षात भरतीप्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षही कामाला लागला असून, त्यांच्याही नेत्यांचे दौरे व बैठका सुरू झाल्या आहेत. ते तर स्वबळाची भाषा करीत आहेत. अशा स्थितीत राज ठाकरे नाशकात येऊनही पक्षीय पातळीवर त्याचा लाभ उचलला गेला नसेल तर अन्य कुणा पक्षासोबत सामीलकीची, म्हणजे खरेच ह्यटाळीह्णची वाट पाहिली जातेय की काय, अशा चर्चा होणारच.