सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी ४८ अधिकाऱ्यांंची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 05:07 PM2020-12-21T17:07:16+5:302020-12-21T17:08:28+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींची प्रशासकीय पातळीवर निवडणूकप्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागात राजकीय रणधुमाळीस प्रारंभ झाला असून, गटातटाच्या बैठका सुरू झाल्या आहेत. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत निवडणुकांना महत्त्व असल्याने गावातील युवकांनी कंबर कसले आहे. यावेळी सर्वच ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची चिन्हे आहेत. तहसीलदार राहुल कोताडे यांनी ४८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

Appointment of 48 officers for 100 gram panchayats in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी ४८ अधिकाऱ्यांंची नियुक्ती

सिन्नर तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींसाठी ४८ अधिकाऱ्यांंची नियुक्ती

googlenewsNext

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना आपला ऑनलाइन अर्ज केवळ ५ दिवसांतच दाखल करावा लागणार आहे. तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींमधील ३३८ प्रभागांतील ९२० जागांसाठी सदस्यांची निवड होणार आहे. निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली असून, मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत. मतदान व मतमोजणी पार पडल्यानंतर सरपंचपदाची आरक्षण सोडत काढली जाणार असल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. तसेच सदस्यांमधून सरपंच निवड होणार असल्याने त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाऊबंदकी व गटातटाला महत्त्व असल्याने उमेदवारीसाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असते. उमेदवारांना आपला नामनिर्देशन अर्ज व घोषणापत्र अगोदर ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. त्यानंतर त्याची प्रिंट काढत त्यावर स्वाक्षरी करून हे नामनिर्देशन अर्ज दि. २३ ते ३० डिसेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत दाखल करता येणार आहेत. मात्र २५, २६ व २७ डिसेंबर रोजी शासकीय सुटी असल्याने या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. प्रशासनानेही निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या संख्येइतक्याच सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ४८ टेबल मांडून ग्रामपंचायतींची जबाबदारीही संबंधित अधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. तहसीलदार राहुल कोताडे, नायब तहसीलदार दत्ता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूकप्रक्रिया राबविली जात आहे.

Web Title: Appointment of 48 officers for 100 gram panchayats in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.