सटाणा मर्चंट बँकेची ६४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर २०१९ ला घेण्यात आली होती. या सभेत विषय क्र मांक दोन हा सन २०१८-१९ या वर्षाचे अंतर्गत लेखापरीक्षण व वैधानिक लेखापरीक्षण यांचा अहवाल मंजूर करणे असा होता .मात्र संचालक डॉ. व्ही. के. येवलकर यांनी त्या विषयाला विरोध केला व विषय नामंजूर करावा यासाठी उपस्थित सभासदांनी आवाजी मताने तो नामंजूर केला होता. परंतु संचालक मंडळाने आपल्या पदाचा गैरवापर करून हेतू पुरस्कर बेकायदेशीरपणे नामंजूर विषयाला मंजुरी देऊन सभासदांची फसवणूक केल्याचा आरोप सभासद भांगडिया यांनी केला. याबाबत त्यांनी २८ जानेवारी रोजी बँकेकडे अर्जाद्वारे माहिती मागितली असता सदर प्रकार उघडकीस आला. सभासदांची फसवणूक करणाºया संचालक मंडळासह संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे वेळोवेळी अर्ज केले होते . मात्र अर्जाला केराची टोपली दाखवल्याने भांगडिया यांनी सोमवारपासून समको बँकेच्या आवारात आमरण उपोषण सुरु केले आहे .डॉ. येवलकर ,यशवंत येवला ,आबा कापुरे ,भीमराव सोनवणे ,बिंदू शर्मा ,धर्मा सोनवणे आदींनी उपोषणकर्त्याची भेट घेतली .दरम्यान सहाय्यक निबंधक महेश भडांगे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी भांगडिया यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र संबधितांवर कायदेशीर कारवाईचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका घेत भांगडिया यांनी उपोषण सुरूच ठेवले आहे.
नामंजूर ठराव मंजूर केल्याने समको बॅँक आवारात उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2020 6:14 PM