नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेले शहर म्हणून नाशिकचा नावलौकिक असला आणि रामकालीन वास्तव्याच्या खुणा ब्रिटिशकालीन दस्तावेजात नोंदवल्या असल्या तरी पुरातत्व खाते ते मानण्यास तयार नाही. सीतागुंफा आणि रामशेज हा भाग सध्याच्या आर्कियॉलॉजिकल सर्व्हेच्या यादीत नसल्याचे निमित्त करून येथे उत्खनन करण्यासही या खात्याची तयारी नाही. गेल्याच जुलै महिन्यात पंतप्रधान कार्यालयाने सीतागुंफा ते रामशेज किल्ल्यादरम्यान असलेले भुयार शोधण्यासाठी दिलेले आदेश यामुळेच बारगळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.श्री काळाराम मंदिराजवळच सीतागुंफेत एक शिवालय असून, त्याच्या पाठीमागील बाजूने सहा मैल अंतरापर्यंत एक भुयारी मार्ग रामाने तयार केला होता. आजच्या स्थितीत ९.०४ किलोमीटर अंतराचा हा प्रवास गुहेने पूर्ण केल्यानंतर आता ज्या ठिकाणी रामशेज किल्ला आहे तेथे प्रभू रामचंद्र भुयारी मार्गाने शयनासाठी जात असत. त्यामुळेच आज येथे असलेल्या किल्ल्याला ‘रामशेज’ असे नाव आहे. ब्रिटिशकालीन गॅझेटियर बॉम्बे प्रेसिडेन्सी नाशिक १८८३ मध्ये यासंदर्भात उल्लेख आहे. त्याचप्रमाणे की टू नाशिक त्र्यंबक या १९४१-४२ साली प्रकाशित पुस्तकातही या भुयारी मार्गाचा उल्लेख आहे. त्यामुळे गोदाप्रेमी नागरी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनीदेखील यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच थेट पत्र पाठविले. त्या कार्यालयाने हे पत्र पुरातत्व खात्याला पाठविले आणि तेथून सुरू झालेला या पत्रप्रवासाचे एक वर्तुळ पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सीतागुंफाबाबत पुरातत्व खात्याचे कानावर हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 12:56 AM