सेना-भाजपला बंडखोरीची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2019 01:03 AM2019-10-03T01:03:21+5:302019-10-03T01:03:55+5:30
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांमध्ये भाजपच्या इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांमधील या बंडखोरीचा लाभ विरोधी पक्षांना झाला असून, नाराज झालेल्यांनी पक्षांतर करून ऐनवेळी उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप व सेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर होताच, प्रत्येक मतदारसंघात नाराजीचा सूर उमटू लागला असून, अपेक्षेनुसार तिकीटवाटप न झाल्याचा मुद्दा पुढे करून इच्छुकांनी बंडाचे निशाण उभारले आहे. स्वपक्षीय उमेदवारांविरोधात बंडखोरी करणाऱ्यांमध्ये भाजपच्या इच्छुकांबरोबरच मित्रपक्ष शिवसेनेच्याही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. सत्ताधारी पक्षांमधील या बंडखोरीचा लाभ विरोधी पक्षांना झाला असून, नाराज झालेल्यांनी पक्षांतर करून ऐनवेळी उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही केली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपेक्षेने गेल्या काही वर्षांपासून मतदारसंघात पक्षसंघटनेच्या माध्यमातून सामाजिक कामे केलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघावर यंदा सेनेने दावा सांगून गेल्या काही महिन्यांपासून सेनेच्या नगरसेवकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी केली जात होती. परंतु जागा भाजपला व विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे सेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी सिडकोतील सर्व सेनेच्या नगरसेवकांची बैठक बोलावून निवडणुकीत भाजपचा प्रचार न करण्याचे संकेत दिले आहेत.
सेनेचे नगरसेवक दिलीप दातीर यांनी जागा भाजपला सुटणार असल्याचे गृहीत धरून दोन दिवसांपूर्वीच मनसेची वाट धरून उमेदवारीही पदरात पाडून घेतली आहे. मित्रपक्षांकडून भाजपसमोर अडचणी उभ्या केल्या जात असताना भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. देवळाली मतदारसंघ सेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाली तरी चालेल, परंतु निवडणूक लढविण्याचा त्यांनी इरादा बोलून दाखविला आहे. इगतपुरी मतदारसंघातून कॉँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनीही समर्थकांची जमवाजमव सुरू केली
आहे.
नांदगाव मतदारसंघ सेनेला सुटल्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे, तर दिंडोरी मतदारसंघातून सेनेने माजी आमदार धनराज महाले यांना तिकीट दिल्यामुळे उमेदवारी मिळण्याच्या अपेक्षेने सेनेत प्रवेश केलेले माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी अपक्ष लढविण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे, तर जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावित यांनी पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे. कळवण मतदारसंघ सेनेला सुटल्याने भाजपचे इच्छुक एन. डी. गावित यांनी नाराजी बोलून दाखविली आहे. बुधवार ठरला ‘पक्षांतरा’चा वार
सत्ताधारी पक्षातील इच्छुकांच्या बंडखोरी व नाराजीतून बुधवारी पक्षांतराने दिवस गाजला. सिन्नरचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्टÑवादीत प्रवेश करून उमेदवारी खिशात घातली, तर मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांनी नाशिक पूर्वचे भाजप आमदार बाळासाहेब सानप यांचा पत्ता कट झाल्याचे पाहून भाजपचे दार ठोठावले आहे. विधानसभेचे नामांकन दाखल करण्यास अजून दोन दिवस शिल्लक असल्याने अखेरच्या दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल.