इंदिरानगर : इंदिरानगर, दीपालीनगर, कमोदनगर यांसारख्या उच्च-मध्यमवर्गीय वस्तीतील प्रभाग क्रमांक २३ मध्ये आजवर शिवसेना-भाजपाचे प्राबल्य राहात आले आहे. यंदाही सेना-भाजपातच मुख्य लढत पहायला मिळणार असून, आजी-माजी नररसेवक पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत आहेत. राष्ट्रवादीच्या एकमेव महिला नगरसेवक यांचा काहीसा प्रभाव वगळता प्रभागात कॉँग्रेस आघाडीचा जोर दिसून येत नाही. प्रभाग २३ हा पूर्वीचा प्रभाग क्रमांक ३८ आणि ४० मिळून तयार झालेला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ह्या प्रभागातील मतदार आजवर शिवसेना-भाजपाच्या बाजूने कौल देत आले आहेत. सद्यस्थितीत याठिकाणी भाजपाचे दोन, राष्ट्रवादी आणि मनसेचे प्रत्येकी एक असे चार नगरसेवक प्रतिनिधित्व करत आहेत. आता महापालिका निवडणुकीत अनुसूचित जमाती महिला गटातून सेनेच्या वर्षा बोंबले, मनसेच्या माजी नगरसेवक रंजना जोशी, मनसेचे नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या पत्नी व भाजपाच्या उमेदवार रुपाली निकुळे यांच्यासह लता करीपुरे व रोशनी शेवरे हे अपक्ष उमेदवारी करत आहेत. भाजपाने उमेदवारी नाकारल्याने लता करीपुरे यांनी बंडखोरी केली आहे. मनसेच्या रंजना जोशी, भाजपाच्या रुपाली निकुळे व सेनेच्या वर्षा बोंबले यांच्यातच खऱ्या अर्थाने चुरस पहायला मिळणार आहे. यशवंत निकुळे यांनी मनसेतून उडी मारत भाजपाकडून पत्नीला उमेदवारी मिळविल्याने प्रचारात विरोधकांकडून त्यांच्या पक्षनिष्ठेविषयी चर्चा होऊ शकते. याशिवाय, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांबाबत निकुळे यांच्यावर अनेकदा आरोप झाल्याने त्याचाही सामना करावा लागण्याची शक्यता आहे. नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग गटातून राष्ट्रवादीच्या विद्ममान नगरसेवक नीलिमा हेमंत आमले, भाजपाच्या मिर्झा शाहिन सलीम बेग, मनसेच्या मंगला रुडकर व सेनेच्या निर्मला थेटे तसेच अपक्ष आफरिन बागवान यांच्यात लढत आहे. प्रभागात राष्ट्रवादीचा फारसा प्रभाव नसला तरी नीलिमा आमले यांचा वैयक्तिक दांडगा जनसंपर्क व आजवर केलेल्या विकासकामांच्या बळावर त्या लढत देत आहेत. त्यांचा मुख्य सामना भाजपा उमेदवारासोबत होण्याची शक्यता आहे.सर्वसाधारण ‘क’ गटातून भाजपाचे विद्यमान नगरसेवक सतीश कुलकर्णी, सेनेचे ऋषिकेश वर्मा, मनसेचे कौशल पाटील, एमआयएमआयएमचे कलीमरजा बुरानोद्दीन पटेल सय्यद व भारिप बहुजन महासंघाचे विनय कटारे यांच्यासह तीन अपक्ष उमेदवार लढत देत आहेत. सलग चार वेळा नगरसेवकपद भूषविणारे सतीश कुलकर्णी यांची बाजू वरचढ असली तरी त्यांना यंदा सेना-मनसे उमेदवाराचे आव्हान असेल.
सेना-भाजपातच मुख्य लढत
By admin | Published: February 16, 2017 11:32 PM