भगूरला पाणीचोरी रोखण्यासाठी लष्कर तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 12:50 AM2019-04-25T00:50:00+5:302019-04-25T00:50:27+5:30
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्यांच्या धाकामुळे पाणीचोरी रोखण्यास मदत होत आहे.
भगूर : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना फक्त पिण्यासाठी पाणी दारणा धरणातून सोडल्यानंतर काही शेतकरी रात्रीच्या वेळी बेकायदेशीरपणे दादागिरी करून शेतीसाठी मोटारीने पाणी उपसा करीत असल्याने भरारी पथकाने शस्रधारी लष्करी जवान ठिकठिकाणी तैनात केले असून, त्यांच्या धाकामुळे पाणीचोरी रोखण्यास मदत होत आहे.
लहवित, भगूर, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, चेहेडी ते सिन्नर आदी भागात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करता, पिण्यासाठी पंधरा दिवस पुरेल इतके पाणी जलसंपदा विभागाने दारणा धरणातून लष्करी बंधारा, भगूर नदी आणि नाशिकरोड, चेहेडी बंधाऱ्यात सोडले आणि बेकायदेशीर शेतकरी पाणी उपसा करणार नाही यासाठी भरारी पथक नेमण्यात आले. तरीही विशेषत: राहुरी, दोनवाडे परिसरातील काही शेतकरी भरारी पथकाला न जुमानता रात्रीच्या वेळी बेकायदेशीर शेतीसाठी पाणी घेऊन शेतीतील विहिरी भरून घेत असल्याचे निदर्शनास आले. असाच प्रकार चालू राहिला तर जिल्हाधिकारी आदेशानुसार पिण्याच्या पाण्यासाठी १५ दिवस पाणी पुरणार नाही आणि दुसरे रोटेशन लवकर मिळणार नाही व पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होण्याची शक्यता लक्षात घेऊन भरारी पथकाने पोलिसांची मागणी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीमुळे पोलीस संरक्षण मिळाले नाही.
दुसरीकडे शेतकरी दादागिरी करून पाण्याचा उपसा करीत असल्याचे पाहून अखेर लष्करी अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत, शस्रधारी लष्करी जवानांना बंदोबस्तासाठी नेमून पाणी उपसा करणाºया शेतकºयांचे पंप, मोटारी जप्त करून वीज जोडणीचे स्टार्टर तोडून टाकले.
शेतक-यांमुळे पाणीसमस्या गंभीर
बुधवारी दुपारपासून लष्कराच्या जवानांनी जोरदार कारवाई करीत, काही मोटारी जप्त केल्या. दरम्यान या संदर्भात लष्करी अधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, लष्करी विभागाला शेतकरी त्रासाने गंभीर पाणी समस्या निर्माण झाली तर आर्मी अॅक्टनुसार शेतकºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.