वीज बिलाची वसुली करताना कर्मचाऱ्यांकडून अरेरावी: ग्राहक हैराण; वसुलीसोबत सेवेलाही प्राधान्य देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:48+5:302021-07-07T04:16:48+5:30
वावी : वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वावी परिसरात सक्तीची वीज बिल वसुली करताना ग्राहकांसोबत अरेरावीची भाषा केली जात असल्याची तक्रार ...
वावी : वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांकडून वावी परिसरात सक्तीची वीज बिल वसुली करताना ग्राहकांसोबत अरेरावीची भाषा केली जात असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. येथील संतोष साप्ते यांच्या घरी एकटी महिला असताना अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातल्याचा प्रकार वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी केला. महिला वीज बिलाचे पैसे देत असतानाही ते न घेता वीज कनेक्शन खंडित केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊनमुळे हातातील काम धंदा गेल्यामुळे लोकांकडे मोठी आर्थिक चणचण भासत आहे. तरीही वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वीज बिल भरण्याच्या तारखेच्या आतच तगादा लावला जात होता. वावी गावात पथकाची नेमणूक करून सक्तीची वसुली मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी टोळीने आलेल्या वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांची भाषा विनंतीची नव्हती तर धमकी देणारी असल्याचे ग्राहकांनी सांगितले. वसुली काळात काही ग्राहकांशी हुज्जत घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये संतोष अण्णासाहेब साप्ते यांच्या घरी एकटी महिला असताना अरेरावीची भाषा वापरत हुज्जत घातली व वीज कनेक्शन खंडित केले. मात्र साप्ते यांची मुदत ५ जुलै असतानासुद्धा कनेक्शन बंद करण्यात आल्याचे म्हणणे आहे. बिलाची रोख रक्कम त्यांच्या मागे घेऊन फिरत असताना संतोष साप्ते यांना वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने गैरभाषा वापरत रोख बिल घेण्याचे नकार दिला व अरेरावीची भाषा वापरली असल्याचा आरोप ग्राहक साप्ते यांनी केला आहे.
कोरोना काळात ग्राहकांना तीन तीन महिन्यांचे बिल एकत्र देऊन काही ग्राहकांची मुदत बाकी असतानाही वीज वितरणने गावात वसुलीचा धडाका लावला होता. माजी सरपंच विजय काटे यांच्याकडे काही नागरिकांनी तक्रारी केल्या; मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना दाद न देता आपली कारवाई चालू ठेवली. शिवाय खंडित केलेले कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी २५० रुपये चार्ज भरण्याचा आग्रह धरला. ग्राहकाशी बोलण्याची पद्धत, वसुलीच्या प्रकाराकडे वरिष्ठांनी लक्ष घालून बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी बँकिंग वेळातच वसुली करावी. नेटवर्क नसताना ग्राहकांना सहकार्य करावे. बिलाची मुदत तपासून पाहावी. सक्तीची वसुली थांबली नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष जोशी यांनी दिला आहे.
इन्फो...
वसुलीसोबत सेवेला प्राधान्य द्या
वावी वीज वितरण कंपनीचे अनेक कर्मचारी मुख्यालयात वावी येथे न राहता अपडाऊन करतात. रात्री- बेरात्री फ्यूज गेल्यानंतर फोन उचलले जात नाही. फ्यूज टाकायला तासन्तास लावतात. वीज बंद असल्याबाबत तक्रार केल्यानंतरही लवकर येत नाही असे प्रकार नेहमीच घडत असतात. सर्व कर्मचाऱ्यांना वावी येथे मुख्यालयात राहणे सक्तीचे करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.