पुण्यातील फडणीस ग्रुपच्या संचालकास अटक

By admin | Published: April 21, 2017 02:01 AM2017-04-21T02:01:41+5:302017-04-21T02:01:57+5:30

नाशिक : कोट्यवधी रुपयांची फसवणूकप्रकरणी फडणीस ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय फडणीस यांना आर्थिक गुन्हे शाखेचे विक्रोळी परिसरातून अटक केली़

Arrested Phadnis Group's manager in Pune | पुण्यातील फडणीस ग्रुपच्या संचालकास अटक

पुण्यातील फडणीस ग्रुपच्या संचालकास अटक

Next

नाशिक : गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेत फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेल्या पुण्यातील नामांकित फडणीस ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय प्रभाकर फडणीस यांना नाशिक पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे बुधवारी (दि़१९) सायंकाळी मुंबईतील विक्रोळी परिसरातून अटक केली़ फडणीस यांना न्यायालयात हजर केले असता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश एम. एस. पठाण यांनी २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
फडणीस ग्रुपमध्ये गुंतवणूक केलेल्या नाशिकच्या गुंतवणूकदारांनी यापूर्वीही अनेकदा संचालकावंर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती़ यांनतर पोलीस आयुक्तांच्या मध्यस्थीनंतर फडणीस यांनी पैसे परत करण्याचे केवळ आश्वासन दिले़ यामुळे काही गुंतवणूकदारांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावल्यानंतर नाशिक शहरातील मुंबईनाका, इंदिरानगर, सरकारवाडा आदि पाच पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल झाले़
फडणीस ग्रुपच्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (दि़ १८) पोलीस आयुक्त, उपायुक्त यांची भेट घेतली, तर काहींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कार्यवाही होत नसल्याची तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांच्या आदेशानुसार आर्थिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक हेमंत सावंत व विजयकुमार पन्हाळे यांच्या पथकाने बुधवारी रात्री विक्रोळी परिसरातून अटक केली़ जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड़ अजय मिसर यांनी न्यायालयात फडणीस ग्रुपने नाशिकमधील गुंतवणूकदारांची ६० कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले, तर गुंतवणूकदारांतर्फे अ‍ॅड़ जयदीप वैशंपायन यांनी फडणीस ग्रुपच्या संचालकांनी पैसे परत करण्याचे खोटे आश्वासन दिल्याचे न्यायालयास सांगितले़
दरम्यान, सुधीर नागेश हिंगे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चौथा गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये दहा कोटी ४३ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ दरम्यान, विनय फडणीस यांना गुरुवारी (दि़२०) न्यायालयात हजर करण्यात आले़ त्यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ यावेळी न्यायालयात हजर असलेल्या गुंतवणूकदारांनी विनय फडणीस यांच्या अटकेबाबत समाधान व्यक्त केले असून, पोलिसांनी कारवाईस उशीर लावल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे़ (प्रतिनिधी)
 

Web Title: Arrested Phadnis Group's manager in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.