गणपत्ती बाप्पांच्या आगमनाने अर्थचक्राला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:17 AM2021-09-11T04:17:01+5:302021-09-11T04:17:01+5:30
नाशिक : गौरी - गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाकाळातही नाशिक शहरातील बाजारपेठेचे अर्थकारण ढवळून निघाले असून, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ...
नाशिक : गौरी - गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाकाळातही नाशिक शहरातील बाजारपेठेचे अर्थकारण ढवळून निघाले असून, गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा शुक्रवारी (दि. १०) गर्दीने फुलून गेल्या होत्या. विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन करण्यासाठी अनेकांनी स्वत:चे नवीन वाहन खरेदी केेले, तर अनेकांनी गणरायांना सोने, चांदीच्या दूर्वा, मोदक अर्पण केल्याने बाजारपेठेतील अर्थकारणाला गती मिळाली आहे. गणपतीची आरास, पूजेचे सामान याबरोबरच सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. या उत्सवामुळे कोरोना संकट काळातही नवचैतन्य अनुभवायला मिळाले. गणरायाच्या आगमनापूर्वीच्या तयारीला दोन दिवसांपासून वेग आला होता. नोकरी - व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरगावी मोठ्या संख्येने असलेले नोकरदार आणि व्यवसायिकही या दोन ते तीन दिवसात नाशिकला परतल्यामुळे प्रवासी वाहतूक व्यवसायही याच काळात गतिमान झाल्याचे दिसून आले. गणेश भक्तांच्या या उत्साहामुळे बाजारपेठांना नवचैतन्य आले आहे. गणेश चतुर्थीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी जनसागरच बाजारपेठांमध्ये उसळल्याचे चित्र होते. यावेळी श्रीफळ, केवड्याची पाने तसेच विविधांगी फळे, फुले खरेदीसाठी महिलावर्गाची विशेष लगबग दिसून आली. त्याचबरोबर गणेशमूर्ती जेवढी आकर्षक त्याहीपेक्षा सजावट चांगली हवी म्हणून आरास सामान खरेदी केले जात होते. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूर्तिकार, शेतकरी, उत्पादक ते विक्रेता सर्वांनाच अर्थार्जन झाले असून, गणपत्ती बाप्पा आगमनासोबत बाजारपेठेत नवचैतन्यही घेऊन आल्याची प्रतिक्रिया बाजारपेठेतून उमटत आहे.
--
महागाईतही सणाच्या खरेदीचा उत्साह
कोरोनाच्या संकटात मोठी आर्थिक झळ सोसलेल्या नाशिककरांमध्ये या उत्सवावर महागाईचे सावट असताही उत्साह दिसून आला. अगदी गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच आपल्या लाडक्या गणरायाचे आपआपल्या क्षमतेप्रमाणे स्वागत केले.
--
विद्युत रोषणाईचा नवा ट्रेंड
गणेशोत्सवात यंदा विद्युत रोषणाईच्या भारतीय वस्तू नव्याने दाखल झाल्या आहेत. एलईडी ५० ते १००, वॅटच्या सिंगल मल्टिकलर फ्रेड लाईट्स, झालर यांसारखे साहित्य खरेदीला भाविकांची पसंती मिळाली. सर्वाधिक पसंती एलईडी बल्बच्या माळांना मिळाली. त्यासोबतच रोबलाईट्स, लेझर लाईट्स, पारलाईट्स, रोटरेटिंग लॅम्प, चक्र, एलईडी फोकस, एलईडी स्ट्रीप सेट, फळे, फुले व पानांची तोरणे, छोटी-मोठी झाडे अशा रोशणाईच्या साहित्याला मोठ्या प्रमाणात मागणी होती.