आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांना ओळखले जाते. नि:स्वार्थ लोकसेवा हे त्यांचे वैशिष्ट्य होते; म्हणूनच ‘जाणता नेता’ यशवंतरावांविषयी महाराष्ट्राला अभिमान आहे. त्यांनी सांस्कृतिक संवर्धनाचा विचार दिला आणि कला-संस्कृती आपले संचित आहे, याची जाणीव करून दिली. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी कृतिशील समाजकारणी म्हणून यशवंतरावांचे नाव आदराने घेतले जाते. याच विचारांतून शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना केली आणि नंतर महाराष्ट्रात विभागीय केंद्राची स्थापना केली. त्यात २००५ मध्ये नाशिक विभागीय केंद्राची स्थापना झाली. त्याच नाशिक केंद्राच्या कोषाध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आणि सध्या कार्याध्यक्षपदावर मी कार्यरत आहे. नाशिकच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अभिरूचीसंपन्न रसिक घडविण्याबरोबरच सामाजिक उपक्रम राबविण्यात प्रतिष्ठानने वेगाने सुरुवात केली. नाशिकची ‘सांस्कृतिक केंद्र’ म्हणून ओळख ठळक करण्यासाठी प्रतिष्ठानने अभिजात आणि दर्जेदार तसेच कला क्षेत्रातल्या नवनवीन समकालीन कार्यक्रम रसिकांना दिलेत. नवोदित कलावंतांना हक्काचं व्यासपीठ म्हणून प्रतिष्ठानने अग्रक्रम दिला आहे. स्व. विनायकदादा पाटील व हेमंतराव टकले यांच्या मार्गदर्शनाने प्रतिष्ठानचे काम करण्याची मला संधी मिळाली. नवे घडवण्याची उमेद, समाज विकासासाठी जाणिवेतून काम करण्याची सुवर्णसंधी होती. माझ्यासाठी ही सुवर्णसंधी होती आणि माझ्या ध्येयासाठी नवे घडवण्याचा आनंद होता व ती जबाबदारी मी आनंदाने स्वीकारली. शरद पवार म्हणजे अखंड ऊर्जेचा झरा आणि नवनवीन संकल्पनांना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्ररणास्थान होय.
समोरच्या व्यक्तीचे बोलणे नीटपणे जाणून घेणे ही त्यांच्या स्वभावाची खासियत आहे. राजकीय व्यासपीठ असो, वसंत व्याख्यानमाला असो किंवा ‘युनो’चे व्यासपीठ असो, त्यांनी आपली वैचारिक भूमिका कायमच जबाबदारीने मांडली आहे. यामुळेच कुठलीही समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या मुळाशी जाणे व अभ्यास करणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे. यासाठी ते दिवसातील सोळा-सोळा तास काम करतात; म्हणूनच आज त्यांनी ‘लोकनेता’ म्हणून स्थान मिळवले आहे. त्यात कष्ट, अभ्यास, जिद्द, चिकाटी व काम करतानाची प्रामाणिक भावना यांचे हे फलित आहे. सत्ता मिळवणे आणि पदांवर काम करीत राहणे, असा व्यापक विचार त्यांच्याजवळ आहे आणि तेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असे म्हणायला हरकत नाही.
सुसंस्कृत समाजकारणाची कास धरून विधायक समाजोन्नतीसाठी झटणारे, प्रयोगशील ध्येयधोरणांचा पुरस्कार करणारे पवारसाहेब सर्वांमध्येच सहा दशकांहून अधिक काळ ‘आपला माणूस’ ही ओळख टिकवून आहेत. समाजमनाशी विकास-पुरुष म्हणून त्यांची नाळ घट्ट करण्यासाठी कायमच तत्पर असणारे आणि आपल्या कार्यशैलीतून कार्यकर्त्यांमध्ये कायमच चैतन्य निर्माण करणारे क्रीडा, उद्योग, कृषी, सहकार, शिक्षण, माहिती-तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रांतील त्यांचे कार्य प्रत्येकाला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
- विश्वास जयदेव ठाकूर, कार्याध्यक्ष
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,
विभागीय केंद्र, नाशिक