नायगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नायगावसह नऊ गावे नळपाणी पुरवठा योजना ठप्प झाली आहे. संबंधीत खात्याच्या दुर्लक्षामुळे देशवंडी व जायगाव येथे कृत्रीम पाणी टंचाई निर्माण झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.नायगावसह नऊ गावे नळपाणीपुरवठा योजनेद्वारे देशवंडी, जायगाव, वडझिरे, मोह, मोहदरी आदी गावांना पाणी पुरवठा होत आहे. मात्र गेल्या आठवडा भरापासून देशवंडी व जायगाव या गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. जायगाव व देशवंडी या दोन्ही गावात पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे सध्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.गेल्या आठ दिवसांपासून पाणी टंचाई निर्माण झाली असतांना संबंधीत विभागाचे अधिकारी जलवाहिनी नादुरस्त झाल्याचे कारण देऊन वेळ मारून नेत आहे. वारंवार नादुरूस्त होण्यामुळे संबंधीत गावांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वडझिरे ते जायगाव दरम्यानच्या जलवाहिनीचा पाईप दबला गेल्याने पाण्याचा दाब कमी होत असल्यामुळे जलकुंभात पाणी पोहचत नसल्याने कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. संबंधीत विभागाने दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच वनीता कापडी, उपसरपंच सुभाष बर्के, पोलीसपाटील मुकेश कापडी, भाऊराव कापडी आदींसह ग्रामस्थांनी दिला आहे.चौकट - देशवंडी येथे जगदंबा देवीचा नवरात्र उत्सव सुरू आहे. सध्या येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची दररोज गर्दी होत आहे. तसेच मंदिरात घटी बसणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गर्दीच्या दिवसात पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने भाविकांना पाणी टंचाईला सामारे जावे लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
देशवंडी व जायगाव येथे कृत्रीम पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 5:42 PM