के. जे. मेहता हायस्कूलमध्ये पहिल्या आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना गझलकार डॉ. अजीज नदाफ. समवेत संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर, प्रवीण जोशी, गणपतराव मुठाळ, मिलिंद पांडे, प्रदीप औटे.
अजीज नदाफ : आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाचे उद्घाटन
नाशिकरोड : मराठी गझलकाराने गायकी ढंगाने गझल लिहायला हव्यात. उर्दू गझलेत मार्क्सवाद येऊ शकतो, तर मराठी गझलेत आंबेडकरवाद का येऊ नये. कलात्मक ढंगाने गजल लिहिली तर ती समाज परिवर्तन घडवून आणते, असे प्रतिपादन ज्येष्ठ गझलकार डॉ. अजीज नदाफ यांनी केले.के. जे. मेहेता हायस्कूलच्या प्रांगणात पहिल्या आंबेडकरवादी गझलवेध संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. नदाफ बोलत होते. नदाफ पुढे म्हणाले की, गझलमधील गेयता सुटू देता कामा नये. अरबी उर्दू गझल उच्चारानुगामी आहे. त्यामुळे ती लघु गुरूच्या नियमात बसत नाही. येत्या पन्नास वर्षातील मराठी गझलेचे हे सुरुवात युग आहे. मराठीतल्या गझलकारांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. जगण्यातली वास्तवता गझलेत आणली आहे. समाज मनाचा आरसा म्हणजेच गझल होऊ शकते, असेही डॉ. नदाफ यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांनी पहिले आंबेडकरवादी गझल संमेलन ऐतिहासिक घटना सांगेल, असा विश्वास वाटतो. वामनदादा कर्डक यांनी लावलेल्या बीजाचे झाड होईल. नव्या प्रतिभा भरकटलेल्या होत्या त्यांना दिशा मिळत नव्हती. आता गझलांना क्र ांतीचे सूत्र मिळत असून, विज्ञान निष्ठा आणि वैश्विकता या गोष्टी या गझलवेध संमेलनात पहायला मिळत आहे, असे मनोहर यांनी सांगितले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व संमेलनाचे अध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर, प्रवीण जोशी, गणपतराव मुठाळ, मिलिंद पांडे, हरेंद्र जाधव, प्रदीप आवटे, शरद शेजवळ, स्वागताध्यक्ष नंदकिशोर साळवे आदी मान्यवर उपस्थित होते.गझल संमेलनाच्या उद्घाटनानंतर दुसरे सत्र डॉ. महेंद्र भवरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यामध्ये ‘आंबेडकरी गझलेचा सूर्योदय- वामनदादा’ या विषयावर गझलकार अशोक जाधव, रविचंद्र हादसंकर, प्रशांत धनविज यांनी आपली मते मांडली. त्यानंतर झालेल्या तिसºया सत्रामध्ये सिद्धार्थ भगत यांच्या अध्यक्षतेखाली मुशायरा पार पडला. अखेरच्या सत्रात गझल गायक डॉ. संजय मोहड यांच्या गझल गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले. आज संमेलनाचा समारोप गझलवेध संमेलनात रविवारी (दि.१८) सकाळी १०.३० वाजता गझलगायन, दुपारी १२ वाजता मुशायरा, दुपारी २.३० वाजता ‘आंबेडकरवादी गझलेचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ४ वाजता ‘आंबेडकरवादी गझलेतील नक्षत्रमुद्रा’ या विषयावर चर्चासत्र आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर यांचे अध्यक्षीय भाषण होईल. यावेळी गायक नंदेश उमप यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.