नाशिक : इंदूर (मध्य प्रदेश) येथे नाशिकचे चित्रकार अनिल माळी आणि केशव कासार यांच्या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.अनिल माळी यांनी रेखाटलेल्या चित्रांमध्ये निसर्गाचे विविध आविष्कार अमूर्त रूपात मांडले आहे. रंगांची विचारपूर्वक उधळण आणि त्याद्वारे घडविलेल्या विविध आनंददायी रचना, हे माळी यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य असून, केशव कासार यांची चित्रे आध्यात्मिक अनुभूतीतल्या अमूर्त तत्त्वांवर आधारित आहेत . साधकाला साधनेत दिसणारे विविध रंग आणि अनाकलनीय अमूर्त आकार यांची समतोल रचना आणि त्या रचनेच्या उभ्या मध्यरेषेवर कुंडलिनीच्या चक्रांची क्रमवार मांडणी या चित्रांत दिसून येते. रंग आणि आकारांची अचूक मांडणी तसेच रंगलेपन तंत्रातील हुकूमत हे कासार यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य आहे. अनिल माळी आणि केशव कासार यांच्यासह या प्रदर्शनात नीलिमा कढे यांचे नृत्य लयीतील, डोंबिवलीच्या वर्षा कुलकर्णी यांचे लडाख येथील निसर्ग चित्र, तर पुणे येथील श्रद्धा केकरे यांचे स्त्रियांच्या विविध भाव भावनांचे चित्रणदेखील या प्रदर्शनात पाहता येणार आहे. बुधवार (दि. २७) ते रविवार (दि. ३१) या कालावधीत प्रितमलाल दुवा आॅडिटेरिअम आणि आर्ट गॅलेरी येथे सकाळी ११ ते संध्याकाळी ८ यावेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे.
नाशिकच्या चित्रकारांचे इंदूर येथे चित्रप्रदर्शन आयोजन रंगांची विचारपूर्वक उधळण आणि त्याद्वारे घडविलेल्या विविध आनंददायी रचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 1:23 AM