त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2020 05:13 PM2020-10-21T17:13:39+5:302020-10-21T17:15:50+5:30
संशयित पोलिसात हजर : आर्थिक वादाचा संशय
नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील माजी नगराध्यक्ष धनंजय तुंगार यांची बुधवारी (दि.२१) त्यांच्याच घराजवळ राहणाऱ्या १८ वर्षीय युवकाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संशयित आरोपी स्वत:हून पोलिसात हजर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, आठ महिन्यांच्या काळात तुंगार कुटुंबावर हा तिसरा आघात असल्याने त्र्यंबकेश्वरी हळहळ व्यक्त केली जात आहे.
धनंजय तुंगार हे त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांचे चिरंजीव होत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.२१) तुंगार यांच्या घरी धनंजय यांचे मोठे बंधू शेखर तुंगार यांच्या बाराव्याचा श्राद्ध विधी सुरू होता. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर धनंजय तुंगार हे अहल्या धरणाकडे फेरफटका मारण्यासाठी गेले असताना त्यांच्याच घराजवळ राहणा-या समीर गोंदके (वय १८) याने तुंगार यांच्यावर चाकूने वार केले. त्यात गंभीर जखमी होऊन धनंजय तुंगार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संशयित आरोपी गोंदके स्वत:हून पोलिसांत हजर झाला. आर्थिक देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेने त्र्यंबकेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.
कुटुंबावर तिसरा आघात
त्र्यंबकेश्वरच्या जडणघडणीत तुंगार कुुटुंबीयांचे मोठे योगदान राहिलेले आहे. त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषविलेले यादवराव तुंगार यांचे याचवर्षी मार्चमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले तर त्यापाठोपाठ यादवराव यांचे ज्येष्ठ पुत्र शेखर ऊर्फ शिवाजीराव यांचे १० आॅक्टोबरला निधन झाले. त्यांच्या निधनाला १२ दिवस उलटत नाही तोच बुधवारी धनंजय तुंगार यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. तुंगार कुटुंबावर आठ महिन्यांच्या काळात हा तिसरा आघात आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.