नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले असून, वसुलीसाठी सुमारे दीड हजार थकबाकीदारांच्या मालमत्तेचे अपसेट प्राइज (मूल्यांकन ) करणारी प्रकरणे सहकार विभागाकडे पाठविली आहेत. या मालमत्तेचे मूल्यांकन झाल्यास लवकरच त्याची लिलावप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा बँकेचा सन २०२०-२०२१ कर्ज वसुली हंगाम सुरू असल्याने चालू वसुली हंगामात जास्तीत जास्त थकीत कर्ज वसुली व्हावी व बँकेच्या खातेदारांना रक्कम उपलब्ध व्हावी, यासाठी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील विभागीय अधिकारी यांची वसुलीबाबत आढावा बैठक घेतली. त्यात जिल्ह्यातील हेतुपुरस्सर कर्ज परतफेड न करणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्तेची अपसेट प्राइज (मूल्यांकन ) निश्चित करण्याचे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. थकबाकीदार सभासदांच्या मालमत्तेचे लिलाव करून थकबाकी कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरू करावी, असे आदेश आहेर यांनी बैठकीत दिले. जिल्हा बँकेने अशा १ हजार ५२४ थकबाकीदार सभासदांची नावे निश्चित केली असून, त्यांची प्रकरणे संबंधित उपनिबंधक,सहायक तालुका निबंधक कार्यालयाकडे सादर करण्यात आली आहेत. थकबाकीदार सभासदांनी कायदेशीर कारवाई टाळून आपला थकबाकीचा भरणा भरावा, असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्हा बँक थकबाकीदारांच्या मालमत्तेचे मूल्यांकन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2021 1:22 AM