नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ च्या अंतिम सामन्यात अथर्व रॉयल्सने संदीप फाल्कन्सचा ५२ धावांनी पराभव करीत स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले असून, अथर्व रॉयल्सच्या १६५ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११३ धावांत गारद झालेल्या संदीप फाल्कन्सच्या संघाला उपविजेते पद मिळाले. अथर्व रॉयल्सची ढासळलेली फलंदाजी सावरत विजयाच्या दिशेने नेणारा मयूर वाघ सामनावीर ठरला. संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अथर्व रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिल्यानंतर अथर्व रॉयल्सने मयूर वाघच्या वादळी शतकाच्या जोरावर संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग क रताना संदीप फाल्कनचा संपूर्ण संघ १७. ३ षटकांमध्ये सर्वबाद ११३ धावाच करू शकल्याने या संघाला ५२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी संदीप फाल्कन्सच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत अथर्व रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवत ठरावीक अंतराने एकामागून एक धक्के दिले. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या स्वप्नील राठोडला अमित लहामगेने १७ धावांवर त्रिफळाचित केले, तर प्रतीक भालेरावने कपिल शिरसाठलाही आठ धावांवर तंबूत धाडले. राहुल विश्वकर्मा अवघ्या ४ धावांवर तुषार इंद्रीकरचा बळी ठरला. कर्णधार वैभव केंदळेही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याला अमित लहामगेने ७ धावांवर प्रतीक भालेरावकरवी झेलबाद केले. अथर्व रॉयल्सची पडझड झाल्यामुळे हा संघ शतकी धावसंख्याही उभारू शकतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली असताना मैदानावर उतरलेल्या मयूर वाघने तुफान फ लंदाजी केली. त्याने चौफे र फटके बाजी करताना ३९ चेंडूंवर ११ वेळा चेंडू सीमापार पाठवत ६ चौकार आणि ५ षटकार टोलवत ६८ धावा फटकावल्या. त्याला सुनील पटेलने १७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकारासह २४ धावांचे महत्त्वाची साथ दिली. समाद अत्तरनेही अवघ्या ५ चेंडूत ३ चौकारांसह झटपट १५ धावा केल्या. त्यामुळे अथर्व रॉयल्सला संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान उभे करता आले. अथर्व रॉयल्सकडून सर्वाधिक धावा करणारा मयूर वाघ याची अंतिम सामन्यातील धडाकेबाज खेळी एनपीएलच्या फायनलमध्ये अविस्मरणीय बनली असून, त्याच्या खेळीच्या जोरावर अथर्व रॉयल्स संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. संदीप फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना मेहारज सय्यदने ४ षटकांमध्ये ३५ धावा देऊन २ बळी मिळवले. प्रतीक भालेरावने ४ षटकांमध्ये २८ धावा देत एक गडी बाद केला. मोहन केसीने ४ षटकांमध्ये २० धावा दिल्या. अमित लहामगेने ३ षटकांमध्ये १६ धावा देत २ बळी घेतले. रोहित भोरेने १ षटकात ९ व सागर लभडेने १ षटकात १७ धावा दिल्या. अथर्व रॉयल्सने दिलेल्या १६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या संदीप फाल्कन्सचा सलामीवीर राहुलने ३२ धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा साथीदार मुझफ्फर सय्यतद अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. सुजय महाजनने ३३ धावांचे चांगले योगदान दिले. परंतु त्याच्यानंतर १३ धावा करणारा तुषार इंद्रीकरशिवाय कोणताही फलंदात दोन अंकी धावसंघ्या करू शकला नाही. अखेरीस फ लंदाजांची फळी तळाला पोहोचल्यानंतर तुषार उंच फटका खेळून झेल बाद झाला. त्यामुळे संदीप फाल्कन्सला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करताना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)
अथर्व रॉयल्स चॅम्पियन
By admin | Published: December 31, 2016 1:33 AM