अंबडमध्ये गुंडांकडून जाळपोळीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:35 AM2021-01-13T04:35:30+5:302021-01-13T04:35:30+5:30
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. रात्रीच्या सुमारास घरांवर दगडफेक करणे, कामगारांना रस्त्यात अडवून त्यांची ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले आहे. रात्रीच्या सुमारास घरांवर दगडफेक करणे, कामगारांना रस्त्यात अडवून त्यांची लूट करण्यासह जाळपोळीचेही प्रकार घडू लागल्याने जणू अंबडमध्ये पोलिसांचा धाकच राहिला नाही की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंबड गावातील सागर दातीर यांचे दातीर एंटरप्राइजेस सर्विसेस या नावाने दुकान आहे. गुंडांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकान बंद असताना दुकानांवर दगडफेक केली तसेच दुकानावर असलेल्या फलकाला आग लावली. तेवढ्यावरच न थांबता गुंडांनी त्यांच्या घरासमोर असलेली दुचाकीदेखील पेटवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. मध्यरात्री गुंडांकडून असे थैमान घातले गेल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेला जवळपास आठवडा पूर्ण होत आला असतानाही या गुंडांचा मागमूस पोलिसांना लागलेला नाही हे विशेष!
--इन्फो--
चोख गस्त अन् गुंडांचा करावा बंदोबस्त
पोलिसांनी अंबड गाव परिसरात चोख गस्त सुरू करून या भागातील गुंड प्रवृत्ती ठेचून काढत गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. औद्योगिक वसाहत, चुंचाळे, दातीरनगर, दत्तनगर, घरकुल परिसर या भागात पोलिसांकडून गस्त वाढविण्याची गरज असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिवसेना शाखा प्रमुख शरद दातीर, साहेबराव दातीर, सागर दातीर, सीताबाई गांगेले, गुणवंत पाटील आदींनी पोलिसांना निवेदन दिले.