धामणगाव-टाकेद रस्त्याची दुरावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 06:31 PM2021-07-05T18:31:08+5:302021-07-05T18:31:42+5:30
नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.
नांदूरवैद्य : महाराष्ट्रात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी टाकेद सर्वतीर्थ ते धामणगांव हा अतिशय महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालतांना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांसह भाविकांनी केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील सर्वपरिचित असलेल्या तसेच रामायण काळातील घटनेतील साक्ष असलेल्या सर्वतीर्थ टाकेद ते धामणगांव या रस्त्याचे २०१४-१५ या वर्षामध्ये सिंहस्थ कुंभमेळाच्या काळात रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आलेले होते. सर्वतीर्थ टाकेद या तीर्थक्षेत्रावर जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्याने महाराष्ट्रातून येणारे हजारो भाविक याच रस्त्याचा वापर करत असतात.
या रस्त्याने भाविकांची तसेच नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. सदर रस्ता अनेक आदिवासी गावांना जोडणारा असून दळवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. कुंभमेळ्याच्या वेळी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या रस्त्यावर अनेक छोटे-मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील एकही खड्डा बुजविण्याचे कष्ट संबंधित विभागाने घेतलेले नाहीत. या रस्त्याने भरवीर बुद्रुक, अडसरे खुर्द, अडसरे बुद्रुक, म्हैसवळण मार्गे राजुर अकोला, टाकेद, वासाळीकडे असंख्य नागरिक व पर्यटक भंडारदऱ्याकडे जात असतात, परंतु हा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात अडकल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे.
या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथील रस्त्यावर नेहमीच खड्डे पडून या रस्त्याची दयनीय अवस्था होत असते. यासाठी संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याचे कायमस्वरूपी मजबूत काँक्रिटीकरण करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
सदर रस्ता हा अतिशय महत्त्वाचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याने अनेक कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, कंपनी कामगार, सिन्नर, नाशिक, मुंबई, इगतपुरी आदी ठिकाणी रोजगाराच्या निमित्ताने ये-जा करत असतात. तरी लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देवून या रस्त्याची दखल घेत हा रस्ता आदिवासी उपाय योजनेअंतर्गत, जिल्हा परिषदेमार्फत अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अतिशय दर्जात्मक कॉंक्रीटिकरण करण्यात यावे अशी मागणी धामणगावचे सरपंच शिवाजी गाढवे, टाकेदच्या सरपंच ताराबाई बांबळे, अडसरेचे सरपंच संतू साबळे, ज्ञानेश्वर मोंढे, मायदराचे सरपंच साहेबराव बांबळे, बाळासाहेब गाढवे, पांडुरंग गाढवे, भाऊसाहेब गाढवे, दौलत बांबळे, संतोष साबळे, संपत मोंढे, नंदू गाढवे, राजाराम गाढवे, नामदेव घुमरे, निवृत्ती जाधव, संतोष जाधव, सागर गाढवे, वसंत गाढवे, रमेश गाढवे, अशोक गाढवे आदींनी केली आहे.
सदर रस्ता सन २०१४-१५ ला कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर बनविल्यानंतर आजपर्यंत या रस्त्याची कुठलीही डागडुजी झालेली नाही. टाकेद तीर्थक्षेत्री भाविक येत असतात. हा रस्ता पर्यटन, शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी दहा ते पंधरा गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून भविष्यात हा रस्ता मजबूत करायचा असेल तर या रस्त्याचे काँक्रिटीकरणच होणे गरजेचे आहे.
- समाधान वारुंगसे उपाध्यक्ष, युवासेना इगतपुरी तालुका.